Thu, Aug 22, 2019 10:21होमपेज › Mumbai-Thane-Raigad › डावे नावापुरतेच शिल्लक : मुख्यमंत्री 

डावे नावापुरतेच शिल्लक : मुख्यमंत्री 

Published On: Mar 05 2018 1:50AM | Last Updated: Mar 05 2018 1:35AMमुंबई : खास प्रतिनिधी

त्रिपुरा आणि नागालँड या पूर्वोत्तर राज्यांमध्ये भाजपने मिळवलेले यश ऐतिहासिक असून आता देशात डावे हे केवळ नावालाच शिल्लक राहिले आहेत आणि काँग्रेसने तर केवळ पोटनिवडणुकाच लढवाव्यात, असा टोमणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह पूर्वोत्तर भारतातील सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.

भाजपच्या नेत्रदीपक यशाबद्दल महाराष्ट्र भाजपच्या कार्यालयात आज कार्यकर्त्यांनी जल्‍लोष साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पूर्वोत्तरात आमचा एक तरी उमेदवार निवडून येईल का, असा प्रश्‍न आम्ही गमतीने विचारत असू; पण त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तिन्ही राज्यांत या निवडणुकीत भाजपला 49 ते 50 टक्के मतदान झाले आहे. या राज्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या आदिवासी समाजाने भाजपवर प्रचंड विश्‍वास दाखवला, त्यामुळे हा विजय मिळाला, असे फडणवीस म्हणाले.

केंद्रातील आधीच्या सरकारने या भागाकडे प्रचंड दुर्लक्ष केले होते. येथील  वन, खनिज संपत्तीने समृद्ध असलेली ही राज्ये देशासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने पंतप्रधानांनी पहिल्यांदाच अ‍ॅक्ट ईस्ट पॉलिसी तयार करून त्यानुसार कामाला सुरुवात केली. एकात्मतेची भावना निर्माण करण्यात मोदींना यश आले, त्यांचा विकासाचा मंत्र आणि अमित शहा यांचे कुशल संघटन कौशल्य यामुळेच अनेक 
कार्यकर्ते भाजपशी जोडले गेल्याचे  मुख्यमंत्री म्हणाले.

हा केवळ ट्रेलर असून आता आगामी कर्नाटकातही भाजपचेच सरकार येईल, तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीतदेखील भाजपच बहुमताने विजयी होईल, असे भाकीत त्यांनी वर्तविले. महाराष्ट्राच्या निवडणुका ठरलेल्या वेळेवरच होतील, असे उत्तर त्यांनी एका प्रश्‍नाला देताना, विरोधक विविध प्रकारचे भ्रम पसरवण्याचे काम करीत असले, तरी त्यास जनतेकडून बॅलेटमधून उत्तर दिले जात आहे, असेही फडणवीस म्हणाले.