होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाठीत वार करणारी ही कोणती सेना?

पाठीत वार करणारी ही कोणती सेना?

Published On: May 25 2018 1:22AM | Last Updated: May 25 2018 1:03AMजव्हार : वार्ताहर

बाळासाहेबांची शिवसेना समोरून लढणारी होती. मात्र, सध्या पाठीत वार करणारी ही कोणती सेना आहे? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केला. ते गुरुवारी (काल) जव्हारच्या राजीव गांधी स्टेडियमवर भाजप उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

फडणवीस म्हणाले, चिंतामण वनगांच्या मृत्यूनंतर मी स्वतः उद्धव आणि सुभाष देसाई यांना फोनवरून आम्ही श्रीनिवासलाच उमेदवारी देणार असून तुम्ही सहकार्य करा असे सांगितले होते. त्यांनी त्याला होकार देऊनही पाठीत खंजीर खुपसला. आम्ही खर्‍या अर्थाने वनगा कुटुंबाला आधार दिला आहे, कारण वनगांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू दिसण्यासाठी शिवसेनेला 3 मेची वाट का पाहावी लागली, असा सवालही त्यांनी केला.

आदिवासींना न्याय मिळवून देणारे कमळाचे फूलच आहे. पालघर जिल्ह्यातील जनतेला भाजपशिवाय पर्याय नसून जनतेची साथ आम्हाला आहे. शिवसेनेने वनगांच्या अश्रूंचे भांडवल केले आहे. त्यामुळे आदिवासी जनता त्यांना माफ करणार नाही. तसेच आम्ही गरिबांसाठी वनजमिनीचा कायदा तयार केला आहे. त्यामुळे जव्हार, मोखाडा, विक्रमगड भागातील आदिवासींना वनजमीन मालकी हक्कपट्टा देणार आहोत. त्यांच्या वनपट्ट्यासाठी समृद्धी विकास शेतीसाठी जल आराखडा तयार करण्यात येणार असून, मोठ्या प्रमाणात शेती व भाजी लागवड करून या भागातील स्थलांतर थांबेल, असे ते म्हणाले. पालघर जिल्ह्यातील आदिवासी, गरीब, मागासवर्गीय कुटुंबांना घरकुल योजने मार्फत अनेक कुटुंबांना घरकुले देण्यात आली आहे.

म्हणूनच पालघर जिल्हा शौचालययुक्त झाला आहे. उज्ज्वला गॅस कनेक्शन योजनेतून जिल्ह्यात 22 हजार कुटुंबांना उज्वला गॅस कनेक्शन दिले. जव्हार, मोखाड्यातील गर्भवती आदिवासी महिलांसाठी बालविकास प्रकल्पा मार्फत योजना सुरू असून या भागातील कुपोषण कमी करण्याचा प्रयत्न करू. तसेच ठाणे जिल्ह्याच्या विभाजनामुळे आदिवासींच्या विकासासाठी पालघर जिल्हा असला तरीही जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पालघर जिल्हाधिकार्‍यांना आठवड्यातून दोन दिवस जव्हारच्या जिल्हा अधिकारी कार्यालयात बसून या भागातील कामेयाच ठिकाणी करायला लावू, असे आश्‍वासन यावेळी दिले.

यावेळी महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, आमदार संजय केळकर, पास्कल धनारे, किसन कथोरे तसेच अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.