Mon, Nov 19, 2018 20:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘दहीकाल्याची हंडी तुम्ही फोडा, अत्याचार, भ्रष्टाचाराची हंडी आम्ही फोडणार’

‘दहीकाल्याची हंडी तुम्ही फोडा, अत्याचार, भ्रष्टाचाराची हंडी आम्ही फोडणार’

Published On: Sep 03 2018 6:54PM | Last Updated: Sep 03 2018 6:54PMठाणे : खास प्रतिनिधी

दहीहंडीचा उत्सव सर्वत्र लोकप्रिय करणार्‍या ठाणे शहरातील दहीहंडी उत्सवासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: ठाण्यात आल्यामुळे येथील गोविंदा पथकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोरील स्वामी प्रतिष्ठानच्या भव्य दहीहंडीस आज दुपारी त्यांनी भेट दिली व समोरील चैतन्याने सळसळणारी तरुणाई पाहून त्यांनी सुद्धा व्यासपीठावर पुढे येऊन उत्साहाने भारतमाता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, प्रभू श्रीकृष्णाचा आशीर्वाद घेऊन तुम्ही दहीकाल्याची ही हंडी फोडा, आम्ही अत्याचार, भ्रष्टाचाराची हंडी फोडू. थरांवर थर लावणार्‍या पथकांचे देखील त्यांनी कौतुक केले.  मुख्यमंत्र्यांच्या आगमनानंतर जय जवानच्या पथकाने ९ थर लावून मुख्यमंत्र्यांना सलामी दिली.

यावेळी स्वामी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी पाटील तसेच त्यांच्या प्रतिष्ठानने दत्तक घेतलेल्या आदिवासी मुलींनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक पिंगळे यांचाही मुख्यमंत्र्यांनी प्रशंसनीय कामगिरीबद्धल शाल देऊन सत्कार केला. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने केरळ पूरग्रस्तांसाठी पाच लाख रुपये आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी दोन लाख रुपये असे सात लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीस दिले. 

याप्रसंगी खासदार कपील पाटील, आमदार संजय केळकर, गणपत गायकवाड, निरंजन डावखरे, प्रसाद लाड, भाजप राष्ट्रीय प्रवक्ता शायना एन. सी. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मनपा आयुक्त संजीव जयस्वाल, शहर अध्यक्ष संदीप लेले यांची उपस्थिती होती.