Mon, Jun 24, 2019 17:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शिवसेनेचे खरे नाही, स्वबळाची तयारी ठेवा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

शिवसेनेचे खरे नाही, स्वबळाची तयारी ठेवा; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Published On: Jun 05 2018 1:37AM | Last Updated: Jun 05 2018 1:37AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

येत्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध सर्व, अशीच लढाई होण्याची शक्यता आहे. आपल्यासोबत शिवसेनाही राहील की नाही, हे सांगता येत नाही. त्यामुळे स्वबळावर लढण्याची तयारी आतापासून करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांना दिले. शिवसेना सोबत नसेल, तर लोकसभा निवडणूक जिंकणे अवघड जाईल, ही धारणाही पालघरच्या निकालाने फोल ठरविल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

4 आणि 5 जूनला सांगली येथे भाजपच्या प्रदेश पदाधिकारी आणि कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, ही बैठक रद्द झाल्याने मुंबईत दादर येथे ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळावर  लढण्यासाठी कंबर कसण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, निवडणुकीची तयारी आतापासून करा. पंतप्रधान मोदी हे देशासाठी काम करीत आहेत. त्यांना जनतेचाही पाठिंबा मिळत आहे. मात्र, बस्तान उठत चालल्यामुळे आपसात पटत नसले, तरी विरोधी पक्ष नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एकत्र येत आहेत. त्यामुळे येणार्‍या लोकसभा निवडणुकीत मोदींविरुद्ध सर्व, असेच निवडणुकीचे चित्र राहणार आहे. त्यामुळे पक्षाला आपली ताकद आणखी वाढवावी लागेल.

शिवसेनेसोबत युती होईल की नाही, हे सांगता येत नाही. अजून त्याबाबत चर्चा सुरू झालेली नाही. शिवसेना सोबत आली तर ठीक, नाहीतर आपल्याला शिवसेनेविरुद्धही लढण्याची तयारी ठेवावी लागेल. शिवसेना सोबत नसेल, तर निवडणुका जिंकणे अवघड जाईल हा समजही आपण पालघरमध्ये खोटा ठरविला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. भाजप सातत्याने निवडणुका जिंकत आहे. अनेक राज्यांतील निवडणुका भाजपने जिंकून तेथे सत्ता मिळविली आहे. मात्र, लोकसभा पोटनिवडणूक हरल्यानंतर प्रसारमाध्यमांनी भाजपच हरला असल्याचे चित्र निर्माण केले. अशा टीकेकडे कार्यकर्त्यांनी लक्ष न देता आतापासून स्वत:ला निवडणूक कामात झोकून द्यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांनी जनतेशी संपर्क वाढवावा. केंद्र आणि राज्य सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी लाभार्थ्यांचे मेळावे घ्यावेत. बूथ संपर्क यंत्रणा मजबूत करताना बूथ विस्तारक नेमून बूथ स्तरावर पक्षाला मजबुती द्यावी, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकार्‍यांना स्वबळावर निवडणुका लढविण्यासाठी आतापासून सज्ज राहण्याचे आवाहन केले.