Fri, Feb 22, 2019 05:54होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आऊटस्टँडिंग लीडरशिप पुरस्काराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सन्मानित

आऊटस्टँडिंग लीडरशिप पुरस्काराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सन्मानित

Published On: Jun 16 2018 1:40AM | Last Updated: Jun 16 2018 1:30AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

अमेरिका दौर्‍यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुक्रवारी वॉशिंग्टन येथे आऊटस्टँडिंग लीडरशिप इन डेव्हलपमेंट हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आपण हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला अर्पित करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अमेरिकेच्या राजधानीत झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांनी सत्काराला उत्तर देताना राज्यातील परिवर्तनपर्वाची यशोगाथा विशद केली. आपण राज्याची सूत्रे हाती घेतली तेव्हा राज्याला मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा सामना करावा लागत होता. शाश्‍वत शेतीसाठी जलसंवर्धन हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे लक्षात घेऊन राज्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी केली. दुष्काळ आणि टँकरमुक्त होण्यासह या गावांमधील अर्थकारणसुद्धा वेगाने बदलत आहे. शेती आणि ग्रामीण अर्थकारणाला नवीन दिशा देण्यासाठी आम्ही विविध अभियाने राबवित आहोत. भविष्यात डिजिटल अर्थव्यवस्था महत्त्वाची भूमिका बाजवणार असल्याने गावांना मोठ्या प्रमाणात रस्त्यांची जोडणी देतानाच डिजिटल कनेक्टिव्हिटी देखील देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.