Wed, Jul 24, 2019 14:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पुनर्वसित व्यक्तींना सवलती द्याव्यात

पुनर्वसित व्यक्तींना सवलती द्याव्यात

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 1:07AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्यातील विविध प्रकल्पातील पुनर्वसित व्यक्तींना दिल्या जाणार्‍या सवलती निर्बंधमुक्त असाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून प्रकल्पग्रस्तांना दिल्या जाणार्‍या जमिनींना वर्ग एकचा दर्जा देण्यासाठी कार्यवाही करा, अशा सूचनाही त्यांनी सोमवारी मंत्रालयात झालेल्या लोकशाही दिनात दिल्या.

या लोकशाही दिनात मुंबई, उरण, चंद्रपूर, भंडारा, अहमदनगर, यवतमाळ, वर्धा, पुणे, ठाणे येथील नागरिकांच्या तक्रारींवर सुनावणी करण्यात आली. वर्धा येथील अमर राऊत यांनी पुनर्वसनासाठी राखीव ठेवलेल्या क्षेत्राचे  संपादन झाले नाही आणि ते विकण्याची परवानगी मिळत नसल्याबाबत अर्ज दाखल केला होता. याच संदर्भात माणिक मलिये यांनी देखील तक्रार दाखल केली होती. त्यावर सुनावणी देताना मुख्यमंत्री म्हणाले, प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना वर्ग 1 चा दर्जा दिला पाहीजे. त्यासाठी वाटप झालेल्या जमीनींवरील निर्बंध काढून त्यांना वर्ग 1 चा दर्जा देण्यात यावा. पुनर्वसित व्यक्तीला ज्या सवलती दिल्या आहेत त्या निर्बंधमुक्त असाव्यात.

अहमदनगरमधील नेवासा येथील मिनीनाथ माळी यांनी शिष्यवृत्ती न मिळाल्याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, आपले सरकार वेब पोर्टलवर तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित विभागाने तात्काळ त्याचे निराकरण केले पाहिजे. या पोर्टवरील तक्रारी लोकशाही दिनात येता कामा नये वेळीच त्यावर कार्यवाही करुन संबंधितांना न्याय द्यावा, असे सांगत मिनीनाथ माळी या आदिवासी विद्यार्थ्याला वेळेवर शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे हलगर्जीपणा करणार्‍या कर्मचार्‍यावर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.