होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ३१ मार्चपूर्वी मुंबईचा नवीन डीपी!

३१ मार्चपूर्वी मुंबईचा नवीन डीपी!

Published On: Feb 26 2018 1:45AM | Last Updated: Feb 26 2018 1:45AMमुंबई : दिलीप सपाटे 

मुंबई शहराचा रखडलेला नवीन प्रारुप विकास आराखडा येत्या 31 मार्चपूर्वी मंजूर करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. गेली चार वर्षांपासून मुंबई शहराचा सुधारित विकास आराखडा रखडलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेने मुंबईचा नवीन डीपीला येत्या महिनाभरात मंजुरी दिली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.  

मुंबईचा सुधारित प्रारुप विकास आराखडा 2014 पासून प्रलंबित आहे. तत्कालीन महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्या काळात तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्यावरुन मोठा गोंधळ उडाला होता. या डीपीमधून मुंबईतील हाजीअलीसहीत अनेक हेरिटेज वास्तू गायब झाल्या होत्या. अनेक ठीकाणी चुकीची आरक्षणे टाकण्यात आली होती. डीपीतील या त्रुटी समोर आल्यानंतर या डीपीला सर्वच स्तरातून विरोध झाला. पक्षीय राजकारणही रंगले. अखेर मुंबई भाजपचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी हा डीपी रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर प्रस्तावित डीपी रद्द करण्यात आला. 

मुंबई महापालिकेचे विद्यमान आयुक्त अजोय मेहता यांच्या नेतृत्वाखाली नवीन डीपी तयार करण्यात आला आहे. या डीपीला मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनेही मान्यता दिली आहे. त्यानंतर तो राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी डीपीला मंजुरीसाठी 31 मार्च ही डेडलाईन निश्‍चित केली आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले, दीड महिन्यांपूर्वी महापालिकेकडून प्रारुप विकास आराखडा राज्य सरकारला सादर झाला आहे. राज्य सरकारला तो मंजूर करण्यासाठी देखील दीड वर्षाचा कालावधी असतो. मात्र, राज्य सरकार येत्या 31 मार्चपूर्वीच त्यावरील सर्व कार्यवाही पूर्ण करेल आणि नवीन डीपी जाहीर केला जाईल.