Tue, Jul 16, 2019 01:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मिले सूर आणि वाजले की बारा!

मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकमेकांवर स्तुतिसुमने उधळतात तेव्हा!

Published On: Aug 31 2018 2:09AM | Last Updated: Aug 31 2018 2:09AMमुंबई : उदय तानपाठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे एकमेकांचे तोंडभरून कौतुक केले. परस्परांवर स्तुतिसुमने उधळली कुणी एरव्ही सांगितले, तर त्यावर विश्‍वास बसणार नाही; पण काल एका कार्यक्रमात खरोखरच असे घडले!

राजकारणात एकमेकांचे कितीही वाभाडे काढले, विरोध केला, तरी व्यक्‍तिगत मैत्रीवर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात याच संस्कृतीचा परिचय दिला. निमित्त होते एका वृत्तवाहिनीच्या माझा सन्मान या पुरस्कारांचे वितरण करण्याचे. या दोन नेत्यांची छोटी मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत विचारल्या गेलेल्या प्रश्‍नांना तितकीच खुमासदार आणि हजरजबाबी उत्तरे या नेत्यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांवर नेहमीच टीका केली जाते. जाहीर सभांमधून एकमेकांचे वाभाडे काढणार्‍या या पक्षांच्या नेत्यांनी मतदारांचे चांगलेच मनोरंजन केले होते. या पार्श्‍वभूमीवर कृतज्ञता पुरस्कार  देवेंद्र फडणवीस यांना द्यायचा झाल्यास कशासाठी द्याल, असा प्रश्‍न ठाकरेंना विचारला गेला, मुख्यमंत्र्यांना की फडणवीस यांना? असा खोचक प्रतिप्रश्‍न करीत उद्धव म्हणाले, एक चांगला मित्र म्हणून मी देवेंद्रजींना हा पुरस्कार देईन. फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे आले, तेव्हा चांगल्या माणसाला संधी मिळत असल्यानेच आम्ही लगेचच पाठिंबा द्यायचे ठरविले होते. एखादी राज्याच्या हिताची गोष्ट त्यांना सांगितली, तर ती लगेचच मान्य करतात आणि त्याची अंमलबजावणीदेखील करतात. राजकारण बाजूला ठेवून जनहिताच्या कामाला प्राधान्य देण्याचा त्यांचा स्वभाव आपल्याला भावतो, असा माणूस माझ्या पक्षात नाही याची खंत वाटते, असेही उद्धव यांनी सांगून टाकले.मुख्यमंत्री फडणवीस यांनीही मग हातचे राखून न ठेवता उद्धव ठाकरेंची स्तुती केली. उद्धव ठाकरे स्पष्ट बोलतात, जे माझ्यासमोर बोलतात, तेच माझ्या पाठीमागेदेखील बोलतात. समोर एक, पाठीमागे दुसरेच काहीतरी बोलायचं, असे ते करीत नाहीत, अशा शब्दांत फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले. उद्धव ठाकरेंना कृतज्ञता पुरस्कार द्यायचा असल्यास तो कशासाठी द्याल, असा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांना विचारला, तेव्हा त्यांच्या छायाचित्रण कलेला, असे सांगून सगळ्यांना चकित केले.