Sun, Aug 18, 2019 15:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्रिपदावर फार काळ राहता येत नाही

मुख्यमंत्रिपदावर फार काळ राहता येत नाही

Published On: May 15 2018 1:35AM | Last Updated: May 15 2018 1:21AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

ज्या रुग्णालयाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले, त्याचे उद्घाटनही माझ्याच हस्ते व्हावे, असा योग कमी येतो. हे हॉस्पिटल वेगाने उभे राहिले, की आपण फार काळ मुख्यमंत्री राहिलो, हे मला कळत नाही. महाराष्ट्रात फार काळ मुख्यमंत्री राहता येत नाही, अशी मिश्किली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुंबईतील विक्रोळीमध्ये शुश्रूषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे भूमिपूजन आणि लोकार्पण असा  योग या तीन वर्षांच्या काळात जुळून आला. समर्पित लोक काम करतात, तेव्हा ते उत्तमच काम करतात, याचे हे रुग्णालय उदाहरण आहे. मूलभूत गरजांप्रमाणेच शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या महत्त्वाच्या गरजा बनल्या आहेत. वातावरणातील बदलामुळे आजारांचे प्रमाण वाढते आहे; पण त्याचबरोबर आरोग्यसेवाही खर्चिक बनल्या आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्‍त केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार मिळतील आणि त्यातून पन्‍नास कोटी जनतेला आरोग्य सेवा मिळेल, अशी महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. महाराष्ट्रातही महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गरजू रुग्णांपर्यंत उपचार पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोग्यसेवेचे क्षेत्र हे व्यावसयिक न राहता, त्यामध्ये सेवेचा भाव असायला हवा. तेच काम शुश्रूषा को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटल करत आहे. अशा प्रकल्पासाठी शासन सर्वतोपरी पाठबळ देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी सहकारातून जनसामान्यांना आरोग्यसेवा देणार्‍या शुश्रूषा हॉस्पिटलचे कार्य दीपस्तंभ ठरावे, असे गौरवोद‍्गार काढले.