Tue, Apr 23, 2019 21:39होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दहिसर रिव्हर मार्चकडे मुख्यमंत्र्यांची पाठ!

दहिसर रिव्हर मार्चकडे मुख्यमंत्र्यांची पाठ!

Published On: Mar 05 2018 1:50AM | Last Updated: Mar 05 2018 1:26AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

दहिसर, मिठी नदी संवर्धनासाठी कार्यरत असणार्‍या रिव्हर मार्च संस्थेच्या कार्यक्रमाच्या ध्वनिचित्रफितीवरून राजकीय गदारोळ उठल्याने रविवारी दहिसर नदीच्या पाहणी दौर्‍याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर पाठ फिरवली. मात्र, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. 

रिव्हर मार्चसाठी सकाळी 6.30 वाजल्यापासून शाळा-महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी उपस्थित होते. 10 वाजेपर्यंत मान्यवराच्या स्वागतासाठी त्यांना ताटकळत उभे राहावे लागले. यावेळी आ.राम कदम, आ.मनीषा चौधरी, नगरसेवक जगदीश ओझा, हरिष छेडा, आसावरी पाटील, जितेंद्र पटेल आदींची उपस्थिती होती. 

मुख्यमंत्री, अर्थमंत्री, अमृता फडणवीस आणि प्रशासनातील अव्वल दर्जाचे अधिकारी यांचा सहभाग असलेली रिव्हर मार्चची ध्वनिचित्रफीत अवघ्या काही मिनिटांची असली  तरी  यावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये राजकारण रंगले आहे. 

भारतीय नागरी सेवा नियमावलीत प्रशासकीय अधिकारी केवळ नोंदणीकृत संस्थांच्याच कार्यक्रमाला रितसर परवानगी घेऊन जाऊ शकतात. रिव्हर मार्च ही संस्था नोंदणीकृत नाही. ही संस्था सोसायटीज रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट 1860 किंवा इतर कोणत्याही कायद्यान्वये नोंदलेली नाही.

नियमानुसार अशा संस्थेच्या उपक्रमात शासकीय अधिकार्‍यांना भाग घेता येत नाही. त्यामुळे मुंबई पालिका आयुक्त अजोय मेहता व मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह संबंधित अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहीजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी केली आहे.