Tue, Mar 26, 2019 21:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › छोटा शकीलचे दाऊदविरुद्ध बंड

छोटा शकीलचे दाऊदविरुद्ध बंड

Published On: Dec 14 2017 2:05AM | Last Updated: Dec 14 2017 1:34AM

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

कुख्यात मोस्ट वाँटेड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचा खास हस्तक छोटा शकील यांच्यामध्ये वाद झाल्याच्या वृत्ताने अंडरवर्ल्ड जगतात एकच खळबळ उडाली आहे. याचा सर्वाधिक धसका ‘आयएसआय’ या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेने घेतला असून भारतात दहशतवादी कारवाया करण्यामध्ये हे वाद बाधा ठरू शकतात. म्हणूनच वाद मिटविण्याचा प्रयत्न ‘आयएसआय’कडून करण्यात येत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते.  

दाऊदच्या इशार्‍यावरून गेल्या तीन दशकापासून डी गँग चलाखीने चालविण्याचे काम शकील करत आहे. मात्र, दाऊदचा भाऊ अनिस इब्राहिमचा यात हस्तक्षेप वाढल्याने शकील नाराज झाला आहे. त्याने कराचीच्या क्‍लिफ्टनमधील आपला ठिकाणाही सोडला. तसेच त्याने मधल्याकाळात दुबई आणि पूर्व आशियाई देशांमध्ये काही बैठका घेतल्याची माहिती समजते. त्यामुळे दाऊद आणि शकीलमधील वाद आपल्याला महागात पडू शकतो, हा धोका लक्षात घेत ‘आयएसआय’ने दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची माहिती मिळते.

छोटा शकीलला दाऊदचा खास हस्तक, तर अनिसला मात्र दाऊदचा भाऊ म्हणून डी कंपनीत किंमत आहे. दोघांमध्ये असलेल्या वादातून दाऊदने काही वर्षांपूर्वी अंमली पदार्थांसह अन्य वस्तूंची तस्करी, बॉलीवूड चित्रपटांचे हक्‍क, पायरसी, बिल्डर, सुपारी किलिंग याची जबाबदारी वाटून दिली होती. संशयी स्वभाव आणि एकट्याने काम करण्याच्या पद्धतीमुळे अनिसने बॉलीवूड आणि अंमली पदार्थांच्या तस्करीतही घोळ घातले. यामुळेच अबू सालेम पुढे उदयास आला होता.

अनिस नाकाम ठरत असताना शकीलने मात्र आपले नेटवर्क वाढवले. विश्‍वासू साथीदारांची फळी उभी करत तो दाऊदचा उजवा हात बनला. शकीलचा टोळीत दबदबा वाढला. दाऊदऐवजी शकीलची जास्त दहशत निर्माण होऊ लागली. ही बाब अनिसला खटकली. तिथूनच दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले. मात्र, मुंबईसह देश-विदेशामध्ये शकीलचे विश्‍वासू साथीदारांचे एक तगडे नेटवर्क आहे.