Mon, Jul 22, 2019 03:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › छोटा शकीलच्या भावानेच नईमला दिली एके-56 

छोटा शकीलच्या भावानेच नईमला दिली एके-56 

Published On: Jul 20 2018 1:12AM | Last Updated: Jul 20 2018 1:00AMठाणे : प्रतिनिधी

दाऊद गँन्गचा हस्तक नईम खानच्या घरी एके 47 सह मोठा शस्त्रसाठा सापडला होता. त्या चौकशीत छोटा शकिलचा भाऊ अनवर शेख याने ही रायफल आपल्याकडे पाठवली होती, अशी माहिती खान याने ठाणे पोलिसांना दिली आहे. ही रायफल कोणत्या उद्देशाने त्याच्याकडे पाठवण्यात आली होती याबाबत मात्र खानने काहीही सांगितलेले नाही, अशी माहिती ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या सूत्रांनी दिली.

दरम्यान, जप्त करण्यात आलेली रायफल छोटा शकिलचा भाऊ अनवर शेख याने माझ्याकडे 2014 साली पाठवली होती, अशी माहिती खानने पोलिसांना दिली. अनवरने फोनवरून संपर्क साधत एक व्यक्ती बॅग घेऊन येईल ती बॅग नीट सुरक्षित ठेवून घे, असे मला निर्देश दिले होते, असा जबाब खानने ठाणे पोलिसांकडे दिला आहे. मात्र, ही रायफल कुठल्या उद्देशाने त्याच्याकडे पाठवण्यात आली होती याबाबत खान काहीही माहिती देत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. खानकडे ही रायफल काही खास उद्देशाने पाठवली गेली असावी असा पोलिसांना संशय आहे. याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

खानच्या घरातून 7 जुलै रोजी ठाणे खंडणी विरोधी पथकाने एके 56 रायफल, 3 मॅगझीन, 95 जिवंत काडतुसे, 2 नाईन एमएम पिस्तूल आणि 13 जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला होता. खान हा एका खुनाच्या गुन्ह्यात जेलमध्ये असल्याने पोलिसांनी त्याची पत्नी यास्मिन नईम खान हिला अटक केली होती. ठाणे पोलिसांनी हस्तगत केलेली रायफल 1993 च्या बॉम्बस्फोटाशी संबंधित असल्याची शक्यता वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी वर्तवली होती. या शस्त्रसाठ्याबाबत खानची चौकशी करणे गरजेचे झाल्याने पोलिसांनी त्याचा न्यायालयातून ताबा मिळवला आहे. 

दुबईत राहतो अनवर

अनवर शेखने एके 56 रायफल आपल्याकडे पाठवली असल्याचे खान सांगत आहे तो छोटा शकिलचा भाऊ असून सध्या दुबईत राहतो. नकली पासपोर्ट बाळगल्याप्रकरणी त्यास काही वर्षांपूर्वी दुबई पोलिसांनी अटक केली होती. अनवर सुरुवातीला मुंबईत दाऊद गँगच्या नावाने खंडणी वसुली करायचा.  खंडणी वसूल करणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे असे अनेक गुन्हे अनवर विरोधात गुजरात आणि मुंबईत दाखल आहेत.