Sun, Jul 21, 2019 00:19होमपेज › Mumbai-Thane-Raigad › दाऊदशी फारकत घेऊन छोटा शकील पोहोचला बँकाकमध्ये?

दाऊदशी फारकत, छोटा शकील बँकाकमध्ये?

Published On: Jan 24 2018 1:53AM | Last Updated: Jan 24 2018 1:53AMमुंबई : अवधूत खराडे

कुख्यात मोस्टवॉन्टेड डॉन दाऊद इब्राहीम आणि खास हस्तक छोटा शकील यांच्यामध्ये उभी फूट पडल्याच्या वृत्ताने अंडरवर्ल्ड जगतात एकच खळबळ उडाल्यानंतर आता शकील बँकॉकमध्ये पोहोचल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी गँगस्टर संतोष शेट्टी आणि रवी पुजारी यांच्याकडून शकीलाला सुरक्षित ठावठिकाणे मिळवून देण्यासाठी मोठ्याप्रमाणात मदत केली जात असून विश्‍वासू साथीदारांच्या तगड्या नेटवर्कच्या आधारे तो आपले बस्तान बसवत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते. 

दाऊदच्या इशार्‍यावरून गेल्या तीन दशकापासून डी गँग चलाखीने चालविण्याचे काम करत असलेल्या शकीलचा मुंबईतील 1993 चे साखळी बॉम्बस्फोट आणि भारतातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये दाऊदसोबत मोठा सहभाग होता. दाऊदचा भाऊ अनिस इब्राहीम याचा डी गँगमधील हस्तक्षेप वाढल्याने नाराज झालेल्या शकीलने दोन महिन्यांपूर्वी दाऊदची साथ सोडली. त्याने कराचीच्या क्‍लिप्टॉनमधील आपला ठिकाणाही सोडल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली. दरम्यान, मोहम्मद डोसाच्या मार्फत डी गँगच्या संपर्कात आलेल्या गँगस्टर शेट्टी याच्यासह ऑस्ट्रेलियास्थित पुजारीने शकीलला बँकॉकमध्ये पोहोण्यापासून त्याला सुरक्षित ठाव-ठिकाणे मिळवून देण्यासाठी मदत केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

दाऊदसोबतच छोटा शकील हा सुद्धा गुप्तचर यंत्रणांच्या तेवढाच टार्गेटवर आहे. दोघांमध्ये फुट पडल्यानंतर शकीलचा ठाव-ठिकाणा शोधण्यासाठीच त्याच्या मृत्यूची बातमी पसरवली गेली. त्यानंतर शकीलने स्वतहून प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधत या वृत्ताचे खंडण केले. गेली तीन दशके तपासयंत्रणांना गुंगारा देण्यात यशश्‍वी ठरत असलेल्या शकीलचा ठाव-ठिकाणा शोधणे सहज शक्य होणार नाही. तसेच बँकॉकसह काही देशांसोबत भारताचे प्रत्यापर्ण करार असल्याची माहिती शकीलला आहे. त्यामुळे तो अटकेच्या भीतीने जास्त सावधगिरी बाळगत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

मधल्याकाळात शकीलचा हस्तक बिलाल, मोहम्मद राशीद, इक्बाल सलीम, युसूफ राजा आणि परवेश खवजा याच्यासह पाकिस्तानातील साथिदार डी कंपनीपासून वेगळे झाले होते. तर शकीलने दुबई आणि पूर्व आशियाई देशामध्ये विश्‍वासू साथीदारांच्या काही बैठका घेतल्याचीही माहिती समोर आली होती. दाऊदचा भाऊ अनीस याच्यासोबत असलेल्या सर्वश्रुत हाडवैरातून त्याला डी गँगचा सामनाही करावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.