Fri, Jul 10, 2020 21:28



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'महाराजांचे शौर्य महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत व मार्गदर्शन करीत राहिलं'

'महाराजांचे शौर्य महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत व मार्गदर्शन करीत राहिलं'

Last Updated: Jun 06 2020 8:57AM

उपमुख्यमंत्री अजित पवार



मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणत हिंदवी स्वराज्य स्थापन केले. ‘प्रजा सुखी तरंच राजा सुखी’ या न्यायाने राज्यकारभार केला. महान योद्धा, कुशल प्रशासक, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष राजा ही ओळख निर्माण केली. राजनिती, युद्धनिती, अर्थकारण, मानवतावाद, पर्यावरणसंवर्धन कुशलतेसह, भविष्याचा वेध घेण्याचे द्रष्टेपण असलेले ते राजे होते. त्यांनी गाजवलेले शौर्य, केलेला पराक्रम, घालून दिलेला राज्यकारभाराचा आदर्श महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत, मार्गदर्शन करीत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना त्रिवार वंदन केले. तसेच महाराष्ट्रातील जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

शिवराज्याभिषेक घराघरांत...

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करताना पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. त्यांच्यासारखा महामानव एकदाच जन्म घेतो आणि अखिल मानवजातीचे कल्याण करून जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात केलेले कार्य अलौकिक आहे. त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जागवली. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ्यांना, अठरापगड जातींना एकत्र करून त्यांच्या मनात, स्वाभिमानाचे, स्वराज्याचे बीज रुजवले.

महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आपलं वाटेल, जिथे सर्वांना न्याय मिळेल असे स्वराज्य निर्माण केले. शेतकऱ्यांना न्याय दिला. कष्टकऱ्यांना स्वाभिमान दिला. शिवराज्याभिषेकाने महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा दिला. त्यांच्यासारखा राजा मिळाला म्हणूनच शिवराज्याभिषेक दिनाचे आपल्या जीवनात सर्वाधिक महत्त्व आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शेतकऱ्यांचे कैवारी, रयतेचे राजे, युगप्रवर्तक राजे अशी ओळख असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना, शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने वंदन करत असताना त्यांच्या विचारांना आदर्श मानून, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने चालण्याचा निर्धार करूया, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कृतज्ञता, आदर व्यक्त केला.