Fri, Aug 23, 2019 14:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › छत्रपती शिवराय हे अखिल भारतीयांचे प्रेरणा केंद्र: मोहन भागवत 

छत्रपती शिवराय हे अखिल भारतीयांचे प्रेरणा केंद्र: मोहन भागवत 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

महाड (किल्ले रायगड): श्रीकृष्ण बाळ

छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल भारतीयांचे प्रेरणा केंद्र असून आपल्या भारत देशाच्या उत्थानाकरिता छत्रपती शिवरायांचे स्मरण सन्वयक असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी किल्ले रायगडावर झालेल्या छत्रपती शिवरायांच्या 338 व्या पुण्यतिथी सोहळा प्रसंगी व्यक्त केले.

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ स्थानिक उत्सव समिती महाड यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 338 व्या पुण्यतिथीचे आयोजन किल्ले रायगडावर केले होते.  या अभिवादन सभेला प्रमुख अतिथी म्हणून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण, आ. भरतशेठ गोगावले, आ. प्रशांत ठाकूर, शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष माजी आ. चंद्रशेखर कदम, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम, उपाध्यक्ष रघुजी आंग्रे, राजीप सदस्य संजय कचरे महाड पं समिती सभापती सीताराम कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

किल्ले रायगड सारख्या पवित्र स्थळांची यात्रा पूर्वपुण्य असलेल्यांनाच घडते. या पवित्र स्थळी यायला मिळणे व  शिवरायांना अभिवादन करणे हे आपले भाग्यच आहेत. संपूर्ण रायगड हेच मार्गदर्शक असून तो मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात सापडू नये म्हणून इंग्रजांनी हा गड उद्ध्वस्त केला. मात्र किल्ले रायगडाच्या अवशेषातून शिवरायांचे विचार पुन्हा पुन्हा उभे राहिले. छत्रपती शिवाजी महाराज हे अखिल भारतीय प्रेरणेचे केंद्र आहेत. आपल्या देशाचे उत्थान करायचे असेल, तर प्रभू रामचंद्र व श्रीकृष्णाला जसे विसरता येणार नाही. तसे छत्रपती शिवाजी महाराजांनाही विसरून चालणार नाही. किल्ले रायगडावर येऊन छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन प्रत्येकाने काही अंशी शिवराय होण्याचा प्रयत्न केला, तर भारत वर्षाचे उत्थान नक्कीच होईल, असा विश्वास सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून, त्यांनी प्रेरणा अखंड राष्ट्राकरिता फलदायी प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले. 

इस्लामी आक्रमणांचा पतनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. काळ बदलला तरी कृती बदलत नाही. श्रीरामाची धर्ममर्यादा, श्रीकृष्णाची नीती त्याचप्रमाणे राष्ट्रोत्थानासाठी प्रयत्न व मार्गदर्शक पुस्तक म्हणून शिवरायांकडे पाहिले जाते. यशस्वी मार्ग सर्वांना जोडणे, सावेत घेऊन चालणे, स्फूर्ती, संकल्प याची चेतना म्हणजे शिवराय अशी महती भागवतांनी सांगितली.

समाज हा सरकार आश्रित नाही, तर समाजाने हवावलंबनाचा पुरस्कार करायला हवा. समाजहिताची देशाला पुढे नेण्याचे कामे हाती घेऊन ती यशस्वी केल्यानेच छ. शिवराय विजयी झाले. त्यांचे अनुकरण प्रत्येकाने करायला. इतरांवर जबाबदारी न टाकता स्वतः पासून ती स्वीकारली पाहिजे, असे आवाहन भागवत यांनी केले. आज आपल्या दुबळ्यापणामुळे देशावर आक्रमक होत आहेत. आया बहिणी सुखरूप नाहीत. देशात भ्रष्टाचारविरोधी आंदोलन करण्याची वेळ का येते असा प्रश्न भागवत यांनी केला. प्रत्येकामध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा असायला हवे असे सांगत. ज्या प्रमाणे संपूर्ण देशाने योग दिवस स्वीकारला त्याचप्रमाणे सरकारी अध्यादेशानुसार देश विदेशात छ. शिवाजी महाराजांच्या मिरवणुका निघतील असा विश्वास डॉ. भागवत यांनी व्यक्त केला. 

ना. रवींद्र चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादामुळेच आपल्यासारख्या किल्ले रायगडावर कार्यकर्ता म्हणून येणाऱ्याला मंत्री व पालकमंत्री म्हणून राज्यसभेवर बसण्याचा मान मिळाल्याचे सांगितले. किल्ले रायगडाची दुरावस्था दूर झाली पाहिजे. यासाठी अनेक अडचणींवर मात करीत पुरातत्व खात्याची परवानगी व निधीची उपलब्धता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व करीत आहोत. किल्ले रायगड व त्यांच्या परिसराचे गतवैभवाचे दर्शन पुढच्या पिढीला व्हावे व त्यातून त्याने स्फूर्ती घेऊन या मानसिकतेतून हे सरकार काम करीत असल्याचे सांगत यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून त्यांचे जतन करावेसे आवाहन ना. चौहान यांनी केले. 

आ. गोगावले यांनी शिवपुण्यतिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा एकत्रितरित्या तिथीनुसार एकाच दिवशी साजरा व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. व रायगडाच्या संवर्धनासाठी श्री. शिवाजी रायगड समितीला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. 

सुरुवातीस समितीचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी आपल्या प्रास्ताविकात गेले 123 वर्षे समिती मार्फत पुण्यतिथीचा कार्यक्रम केला जात असल्याचे सांगून किल्ले रायगडावर शिवसमाधी श्री शिवाजी रायगड स्मारक समिती मार्फत बांधली गेली असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीस हातभार लावणाऱ्या सरदारांच्या वंशजांच्या, सैन्य दलात काम करणाऱ्या निवृत्त सैनिकांचा सत्कार यावेळी गेली 8 ते 10 वर्षांपासून केला जात असल्याचे सांगत. रायगड विकास आराखड्याची मागणीही  व पाठपुरावा समितीने केल्यामुळे रायगड संवर्धनासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे व या संवर्धन समितीमध्ये रायगड स्मारक समितीचे तीन सदस्य असून समितीला अपेक्षित असलेले संवर्धन होण्याचा आमचा प्रयत्न असेल असे त्यांनी सांगितले. 

याप्रसंगी श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार शिवभक्त प्रतिष्ठान पंढरपूर, कै. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे, यांना (मरणोत्तर) विशेष पुरस्कार, वीर सरदार कानोजी जेधे यांचे वंशज मेजर जनरल (विठ्ठल), मनोज ओक यांचा सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन श्री राठोड यांनी केले. 

सुरुवातीस सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी श्री जगदीश्वराचे दर्शन घेऊन छ. शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन केले. त्यानंतर राजसदरेवरील, मेघडंबरीतील छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले.

Tags : Mohan Bhagwat, Chhatrapati Shivaji Maharaj


  •