Tue, Jul 23, 2019 16:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘ओबीसी योद्धा’ने  भुजबळांना गौरवणार

‘ओबीसी योद्धा’ने  भुजबळांना गौरवणार

Published On: May 06 2018 2:01AM | Last Updated: May 06 2018 1:46AMमुंबई : प्रतिनिधी

न्यायालयाकडून जामीन मिळालेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना ओबीसी योद्धा पुरस्काराने गौरविले जाणार आहे. 11 मे रोजी मुंबईतील आझाद मैदानात भारीप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.  अशी घोषणाच शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार हरिभाऊ राठोड यांनी केली. हा पुरस्कार ओबीसी जनगणना अभियानतर्फे देण्यात येणार आहे.               
संविधानिक न्याय यात्रांतर्गत राज्यस्तरीय ओबीसी जातनिहाय जनगणना अभियान 11 एप्रिल 2018 रोजी पुणे येथील समताभूमी-फुलेवाड्यापासून सुरू झाली आहे. 11 मे रोजी सकाळी 11 वाजता या अभियानाच्या समारोपाची जाहीर सभा आझाद मैदानावर घेण्यात येणार आहे.    

4 मे रोजी सोलापूर येथे राज्य मागास वर्ग आयोगाला निवेदन देण्यासाठी गेलेल्या माळी महासंघाच्या शंकरराव लिंगे यांना काळे फासण्याचा प्रयत्न करणार्‍यांना तातडीने अटक झाली पाहिजे, अशी मागणीही यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आली. राज्यातील सध्याचे सरकार भाडोत्री गुंडांना हाताशी धरुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही करण्यात आला. परिषदेचे उद्घाटन प्रकाश आंबेडकर करतील. उत्तर प्रदेशचे गोरखपूर मतदारसंघातून नुकतेच निवडून आलेले खासदार इंजिनियर प्रवीणकुमार निषाद, हरियानाचे ओबीसी खासदार राजकुमार सैनी, हुसेन दलवाई हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित रहणार आहेत.

Tags : Mumbai, mumbai news, Chhagan Bhujbal, OBC Warrior Award, honored,