Mon, Mar 18, 2019 19:18होमपेज › Mumbai-Thane-Raigad › छगन भुजबळ यांना डिस्चार्ज; सांताक्रूझकडे रवाना 

छगन भुजबळ यांना डिस्चार्ज (Video) 

Published On: May 10 2018 10:25AM | Last Updated: May 10 2018 2:01PMमुंबई : पुढारी ऑनलाईन 

काही दिवसांपूर्वीच जामीन मंजूर झालेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना आज केईएम रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. छगन भुजबळ रूग्णालयातून थेट त्यांच्या सांताक्रूझ येथील निवासस्थानाकडे रवाना झाले. भुजबळ महाराष्ट्र सदनासह अनेक गैरव्यवहारांप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत तुरुंगात होते. 

वाचा : भुजबळांच्या जामीनावर शरद पवार प्रथमच बोलले

भुजबळांना जामीन मंजूर झाला होता. पण, स्वादुपिंडाच्या त्रासामुळे त्यांच्यावर केईएम रूग्णालयात उपचार सुरू होते. जामीन मंजूर झाल्यापासून भुजबळ बाहेर कधी येणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी छगन भुजबळांची रूग्णालयात भेट घेतली होती. 

वाचा : भुजबळांना जामीन मिळाला; कोण काय म्हणाले..

घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी छगन भुजबळ अडीच वर्षे तुरूंगात होते. अखेर त्यांना जामीन मंजूर झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके आणि पेढे वाटून आनंद साजरा केला होता. रूग्णालयातून छगन भुजबळ मुंबईतील निवासस्थानी गेले असले तरी ते येवल्याला कधी येणार याचीच कार्यकर्ते वाट पाहत आहेत. 

पुण्यात होणार भुजबळांचा हल्लाबोल

पुण्यात १० जून रोजी होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी छगन भुजबळ थेट सर्वांसमोर येणार आहेत. याप्रसंगी मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच सभेत राज्यभर सुरू असलेल्या राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाचा शेवटही करण्यात येणार आहे. यावेळी सभेत भुजबळ यांचे पहिल्यांदा जाहीर सभेत
हल्लाबोल करणार आहेत.

लगेच ॲक्टीव्ह होऊ नका; भुजबळांना डॉक्टरांचा सल्ला

केईएम रूग्णालयातून बाहेर आल्यावर भुजबळांनी पत्रकारांशी बातचीत केली. ‘स्वादूपिंडाच्या आजाराने ग्रासलो होतो. केईएममधील सर्वच डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. आराम करण्याच्या अटीवरच डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला. लगेच ॲक्टीव्ह होऊ नका असे डॉक्टरांनी सांगितले आहे, असे छगन भुजबळ म्हणाले. पत्रकारांशी बोलताना भुजबळांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटत होती. 

रूग्णालयातून थेट सांताक्रूझ येथील घरी गेलेले छगन भुजबळ यांनी कुटुंबासोबत वेळ घालवणार असल्याचे सांगितले. पुढील उपचाराबाबतही लवकरच निर्णय घेणार असल्याचेही ते म्हणाले.