Sun, May 26, 2019 09:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पंकज भुजबळांनी मानले डॉक्टरांचे आभार

पंकज भुजबळांनी मानले डॉक्टरांचे आभार

Published On: May 10 2018 1:09PM | Last Updated: May 10 2018 12:31PMमुंबई : प्रतिनिधी

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेले उपचार व घेतलेली काळजी यामुळे त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत आहे. त्यामुळे भुजबळांचे पुत्र आमदार पंकज यानी केईएम रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचा-यांचे विशेष आभार मानले. यासंदर्भातील एक पत्रक त्यांनी प्रसिद्ध केले आहे. 

पंकज भुजबळ यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, माझे वडील माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे गेल्या दोन महिन्यांपासून स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त आहे. आधी त्यांना जे.जे. रुग्णालयात आणि नंतर केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. केईएम रुग्णालयाचे डीन डॉ. सुपे, डॉ. कंथारिया, डॉ. नाडकर, डॉ. भाटीया, डॉ.पटवर्धन, डॉ. प्रभू तसेच डॉ.शर्वरी पुजारी इत्यादी निष्णात डॉक्टर मंडळींनी छगन भुजबळ यांच्या वेगवेगळ्या आजारावर मेहनत घेऊन उपचार केले.त्यामुळे काही प्रमाणात त्यांच्या आजारावर उतार पडला आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, तथापि, आणखी काही दिवस त्यांना उपचाराची अथवा शस्त्रक्रियेची गरज आहे. गेली सव्वादोन वर्ष ते कुटुंबापासून दूर आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या परवानगीने ते काही दिवस घरी कुटुंबियांमध्ये परतले आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने काही दिवसात त्यांना पुन्हा इस्पितळात दाखल करून पुढील उपचार केले जातील. या कठीण काळामध्ये केईएमचे डॉक्टर आणि कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य मिळाल्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत असे त्यांनी शेवटी म्हटले आहे.