Sun, Nov 18, 2018 13:24



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › छगन भुजबळांना पुन्हा झटका

छगन भुजबळांना पुन्हा झटका

Published On: Dec 19 2017 2:03AM | Last Updated: Dec 19 2017 1:08AM

बुकमार्क करा





मुंबई :  प्रतिनिधी 

महाराष्ट्र सदनासह अनेक गैरव्यवहारांप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने पुन्हा एकदा झटका दिला. या न्यायालयाचे न्या. एम़  एस़  आजमी यांनी भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ या दोघांचा जामीन अर्ज आज फेटाळून लावला.

दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी मार्च 2016 पासून अटकेत असलेल्या छगन भुजबळ आणि त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनी यापूर्वीही जामिनासाठी पीएमएलए कोर्ट आणि हायकोर्ट यांच्याकडे धाव घेतली होती. सवोर्र्च्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात पीएमएलए कायद्यातील कलम 45 (1) असंविधानिक ठरवत रद्द केल्याने भुजबळांनी पुन्हा नव्याने जामिनासाठी अर्ज केला होता.

या अर्जावर उभय पक्षांच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवत सोमवारी निर्णय देणार असल्याचे स्पष्ट केल्याने सर्वांचे लक्ष निर्णयाकडे लागून राहिले होते. दुपारी तीनच्या सुमारास न्यायालय निर्णय जाहीर करणार होते. मात्र न्यायालयाने सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास भुजबळ यांचा जामीन अर्ज फेटाळताना ईडीचा युक्तिवाद ग्राह्य मानला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे भुजबळांची मोठी निराशा झाली. या निर्णयाविरोधात लवकरच उच्च न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचेही भुजबळ यांच्या वतीने अ‍ॅड. चौधरी यांनी स्पष्ट केले.

भुजबळ यांच्या अर्जाला ईडच्या वतीने अ‍ॅड. हितेन वेणेगावकर यांनी जोरदार विरोध केला होता. पीएमएलएचे कलम 45 सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले असले तरी त्याआधारे भुजबळांना जामीन देता येणार नाही़   त्यांना आधी आपण गुन्हा केला नाही हे सिद्ध करावे लागेल, अशी भूमिका घेताना भुजबळ यांच्या जामीन अर्ज असंविधानिक असल्याचा दावा केला होता.  तर जामीन अर्जावर भुजबळ यांच्या वतीने युक्तिवाद करताना महाराष्ट्र सदन घोटाळा हा निव्वळ राजकीय षडयंत्राचा भाग असून आपल्याला यात गोवण्यात आल्याचा दावा केला. ज्येष्ठ नागरिक असूनही गेले 21 महिने आपण जेलमध्ये आहोत. या प्रकरणातील अन्य 17 जणांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे.