Thu, May 23, 2019 05:00होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत हापूस स्वस्ताईचा केमिकल लोचा; दर अर्ध्यावर

मुंबईत हापूस स्वस्ताईचा केमिकल लोचा; दर अर्ध्यावर

Published On: Apr 30 2018 1:44AM | Last Updated: Apr 30 2018 1:43AMनवी मुंबई : राजेंद्र पाटील 

हापूसवर केमिकल फवारणीचा व्हिडीओ व्हायरल झाला असतानाच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी हापूसच्या तब्बल 90 हजार पेट्यांची आवक झाल्याने दर मोठ्या प्रमाणात कोसळून जवळपास निम्म्यावर आले. किरकोळ बाजारात जो आंबा 400 रुपये डझनाने विकला जात होता तो 200 रुपयांवर आला. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने आंबा कोल्हापूर आणि सांगली बाजारपेठेत पाठवण्याची वेळ आली. 

गेल्या आठवड्यात हापूसवर इथरेल केमिकलची फवारणी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर 25 एप्रिल रोजी ठाणे अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकून 105 व्यापार्‍यांकडून हापूसचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. दुसर्‍या दिवशी बाजारातील रायप्लिगं चेंबरची माहिती घेतली. त्याचा अहवाल अद्याप आला नसला तरी या व्हायरल व्हिडीओने खळबळ माजली. अशा वातावरणातच शनिवारी पुणे बाजार तर रविवारी अहमदाबाद येथील बाजार बंद असल्याने शनिवारी मुंबई एपीएमसीत 90 हजार पेट्यांची आवक झाली, त्यामुळे हापूस आंब्याच्या पाच ते आठ डझनची पेटीचे दर एक हजार रुपयांनी घसरले, अशी माहिती घाऊक व्यापारी संजय पानसरे यांनी पुढारीशी बोलताना दिली. 

आवक वाढूनही ग्राहक बाजारात फिरकला नसल्याने व्यापार्‍यांनी मुंबईतून इतर बाजारात माल विक्रीसाठी पाठवल्याचे पानसरे म्हणाले. शिवाय त्याचा परिणाम निर्यातीवरही झाल्याचे त्यांनी सांगितले. 1500 ते 3500 हजार रुपये मिळणारी हापूसची पेटी शनिवारी 1 हजार ते 2500 रुपयांवर आली. यामुळे एकाच आठवड्यात बाजारभाव एक हजार रुपयांनी उतरला.

Tags : Mumbai, mumbai news, Haupus Swastai, Chemical loop,