Sat, Nov 17, 2018 12:14होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भाजपने भरून घेतले ‘स्वस्त’ घरांचे अर्ज

भाजपने भरून घेतले ‘स्वस्त’ घरांचे अर्ज

Published On: Feb 13 2018 2:23AM | Last Updated: Feb 13 2018 1:33AMमुंबई : प्रतिनिधी 

आगामी लोकसभा आणि विधानसभेचे वेध लागलेल्या भारतीय जनता पार्टीने (भाजपा) मतदारांना खूश करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी 2000 ते 2011 मधील पुरावे असणार्‍या झोपडीधारकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर देण्यासाठी भाजपा झोपडीवासीयांकडून अर्ज भरून घेत आहे. 

म्हाडाकडून राज्यभरात घरे उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. 2022 पर्यंत सर्वांना घर देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना जाहीर केली आहे. गेल्या निवडणुकांमध्ये अच्छे दिनचे स्वप्न दाखवणार्‍या भाजपाने आता मुंबईतील झोपडपट्टीधारकांना खूश करण्याची रणनीती आखली आहे. 2000 ते 2011 या कालावधीतील झोपडपट्टीमधील रहिवाशांकडे या कालावधीचा पुरावा असल्यास संबंधित पुरावा आणि अर्ज भाजपा कार्यालयात जमा करण्यास कलिना विधानसभा क्षेत्रात सुरुवात झाली आहे. राज्यात ही योजना राबवण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून सरकारने म्हाडाची नेमणूक केली आहे.

प्रधानमंत्री आवास योजना जाहीर झाल्यानंतर शहर आणि उपनगरांत खासगी संस्था, संघटनांकडून अर्ज भरून घेण्यात येत होते. मात्र म्हाडाने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी कोणत्याही संस्थेची अर्ज भरून घेण्यासाठी नियुक्ती केली नसल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे संघटनांची अर्ज भरून घेण्याची दुकाने बंद झाली.  राज्यातील 2011 पर्यंतच्या झोपड्यांना राज्य सरकारने दिलासा दिला असून 2000 नंतरच्या झोपड्यांमधील रहिवाशांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे देण्यात येणार आहेत. मात्र यासाठी बांधकाममूल्य झोपडीधारकांना भरावे लागणार आहे. या निर्णयाचा लाभ भाजपाकडून घेण्यास सुरुवात झाली आहे.