Tue, Apr 23, 2019 21:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › खासगी शाळांची स्वस्त वीज बंद!

खासगी शाळांची स्वस्त वीज बंद!

Published On: Jun 12 2018 1:57AM | Last Updated: Jun 12 2018 1:45AMमुंबई : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील खासगी शाळांना देण्यात येत असलेली स्वस्त वीज बंद करण्यात आली असून राज्याच्या ऊर्जा खात्याने याबाबतचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील माहितीनुसार, राज्यातील खासगी शाळांना सामाजिक दृष्टिकोनातून वीज बिलात 9 टक्के विद्युत शुल्कास माफी दिली जात होती. मात्र खासगी शाळांच्या नफेखोरीच्या धोरणामुळे राज्य शासनाने ही सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत शुल्क कायदा 1958 मधील तरतुदीनुसार सार्वजनिक संस्था कायदा 1950 नुसार नोंदणीकृत खासगी शाळांना विद्युत शुल्कात ही सवलत दिली जात होती. आता हा कायदाच रद्द करण्यात आला आहे. याऐवजी महाराष्ट्र विद्युत शुल्क कायदा 2016 लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार नगरपालिका, महापालिका तसेच जिल्हा परिषद यांच्यातर्फे चालवल्या जाणार्‍या शाळांनाच विद्युत शुल्कात माफी दिली जाणार आहे.

गेल्या काही वर्षांत राज्यात मोठ्या प्रमाणात खासगी शाळा सुरु झाल्या आहेत. यातील अनेक शाळा आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेपणा तसेच अन्य सुविधांच्या नावावर मोठे  शुल्क वसूल करत असतात.  असे असतानाही या शाळा विद्युत शुल्कात माफी मागत आहेत. यामुळे सरकारला वार्षिक लाखो रुपयांचा बोजा सहन करावा लागत आहे.