Mon, Mar 25, 2019 14:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › धर्मादाय रुग्णालयातील उपचारासाठी उत्पन्न मर्यादेत वाढ

धर्मादाय रुग्णालयातील उपचारासाठी उत्पन्न मर्यादेत वाढ

Published On: Mar 17 2018 1:43AM | Last Updated: Mar 17 2018 1:38AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

आर्थिक उत्पन्नाच्या मर्यादेवर बोट ठेवुन राज्यातील धर्मादाय रुग्णालये गोरगरीबांना उपचार नाकारत असल्याची गंभीर दखल घेत विधि व न्यायराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आर्थिक दुर्बल घटकांची उत्पन्न मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या रुग्णालयांतील उपचारासाठी असलेली उत्पन्न मर्यादा 85 हजार रुपयांवरुन 1 लाख 60 हजार करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी विधानपरिषदेत दिली.

राज्यातील धर्मादाय रुग्णालये गरीबांवर उपचार करण्यास चालढकल करत आहेत, असा औचित्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य जयदेव गायकवाड यांनी उपस्थित केला होता. मुंबई, पुण्यामधील धर्मादाय हॉस्पिटलमध्ये उपचाराआधीच रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम घेतल्या जातात. रुग्णाचे निधन झाल्यानंतर सपुर्ण बील दिल्याशिवाय मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देत नाहीत. उत्पन्नाची मर्यादा फार कमी असल्यामुळे आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना उपचार मिळत नाहीत. त्यामुळे ही मर्यादा आणखी वाढविण्याची सूचना गायकवाड यांनी केली. 

धर्मादाय रुग्णालयांमधील 10 टक्के खाटा गरीबांसाठी राखीव आहेत. परंतू ग्रामीण भागांमधुन येणार्‍यांना कोणत्या रुग्णालयांमध्ये किती खाटा शिल्लक आहेत, याची माहिती दिली जात नव्हती. त्याचा फायदा घेऊन काही रुग्णालयांचे प्रशासन खाटा शिल्लक नसल्याचे सांगत होते. आता मुंबई, पुणे व मोठ्या शहरांमधील सरकारी रुग्णालयांमध्ये धर्मादाय रुग्णालयांमधील रिकाम्या खाटांची माहिती बोर्डावर लावली जात आहे. यापुढे राज्यातील आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांमधील रुग्णालयांमध्येही अशा प्रकारची सुविधा उपलब्घ केली जाईल. - डॉ. रणजीत पाटील, विधि व न्यायराज्यमंत्री

Tags : mumbai, mumbai news, Charity Hospital, treatment, income limit Increase,