Tue, Jul 23, 2019 06:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोपलवारांच्या हाती पुन्हा समृद्धीची सूत्रे

मोपलवारांच्या हाती पुन्हा समृद्धीची सूत्रे

Published On: Dec 27 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 1:20AM

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी 

कथित वादग्रस्त ध्वनिफितीमुळे नव्या वादात सापडलेले सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार पुन्हा सरकारी सेवेत रुजू झाले आहेत. त्यांना चौकशी समितीने क्‍लीन चिट दिल्यानंतर त्यांनी सोमवारी राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारला. 

समृद्धी महामार्गावरून सरकार आणि शेतकर्‍यांमध्ये सध्या संघर्ष सुरू आहे. हा महामार्ग पूर्ण करण्याची जबाबदारी असलेल्या मोपलवार यांच्यावर कथित ध्वनिफीत व्हायरल झाली होती. या ध्वनिफितीत मोपलवार हे एका मध्यस्थामार्फत इमारतीच्या बांधकामासाठी लाचेची मागणी करीत असल्याचे संभाषण होते. मोपलवार यांचे वादग्रस्त फोन संभाषण समृद्धी महामार्गाला विरोध करणार्‍या शेतकर्‍यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरही व्हायरल झाले होते. ही ध्वनिफीत व्हायरल होताच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले. मोपलवार यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी विरोधकांनी सभागृहाचे काम बंद पाडले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्यामार्फत चौकशी करण्याची घोषणा केली. त्यानंतर मोपलवार यांना रजेवर पाठविण्यात आले होते. त्यांचा अतिरिक्त पदभार सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्याकडे देण्यात आला. 

मात्र, जोसेफ समितीने राधेश्याम मोपलवार यांना क्‍लीन चिट दिली. न्यायवैधक तपासणीत सदर संभाषणातील आवाज हा राधेश्माम मोपलवार यांचा नसल्याचा अहवाल समितीने राज्य सरकारला दिला. त्यानंतर मंगळवारी त्यांच्या फेरनियुक्तीचे आदेश काढण्यात आले.