होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उन्मत्त फेरीवाल्याने छेड काढून महिलेला झोडपले

उन्मत्त फेरीवाल्याने छेड काढून महिलेला झोडपले

Published On: Dec 14 2017 2:05AM | Last Updated: Dec 14 2017 1:24AM

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी येथे राहणार्‍या एका 49 वर्षीय महिलेला त्याच परिसरातील एका फेरीवाल्याने छेडछाड करून झोडपल्याचा प्रकार घडला. या मारहाणीमुळे भेदरलेल्या महिलेने आपल्या मुलासह कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले. परंतु पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून या महिलेला घरी जाण्यास सांगितले. या प्रकारामुळे कोळसेवाडी परिसरातील रहिवाश्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात हनुमान वाडीतील सीतारामभाऊ शेलार चाळीत राहणार्‍या कलावती सोनवणे (49) या सायंकाळी नोकरीवरून घरी जात होत्या. या महिलेच्या घराच्या रस्त्यावरच एका फेरीवाल्याने हातगाडी लावून रस्ता अडवून ठेवला होता. रस्त्यातून गाडी बाजूला घेण्यास सांगितल्यानंतर त्याने थेट या महिलेला शिवीगाळ सुरू केली. तसेच रस्ता तुमच्या बापाचा आहे का? असा सवाल करत फेरीवाल्याने थेट या महिलेच्या अंगावर हात टाकला. हाताने ढकलून या महिलेला खाली पाडले. त्यानंतर या महिलेला मारहाण करून शिवीगाळ केली. या प्रकारानंतर भयभीत झालेल्या महिलेने थेट कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठले. 

या प्रकरणी उन्मत्त फेरीवाल्यावर कठोर कारवाई करण्याची तिने उपस्थित पोलिसांना विनंती केली. मात्र पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून या महिलेची बोळवण केली. या प्रकारामुळे पोलीस फेरीवाल्याला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत असून याप्रकरणी रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.