Sun, May 26, 2019 16:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जिल्ह्यांचे परिवर्तन करणारे प्रकल्प मुदतीत पूर्ण करा : मुख्यमंत्री

जिल्ह्यांचे परिवर्तन करणारे प्रकल्प मुदतीत पूर्ण करा : मुख्यमंत्री

Published On: Aug 24 2018 12:46AM | Last Updated: Aug 24 2018 12:36AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये रेल्वे पूल, जलवाहिनी, नदीपात्राचे रुंदीकरण, सांडपाणी निचरा, पर्यटनाला आणि एकंदरीतच जिल्ह्याचे परिवर्तन करणारे प्रकल्प मुदतीत पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले.

मंत्रालयातील मुख्यमंत्री वॉर रुममध्ये जिल्ह्यात परिवर्तन घडवून आणणार्‍या प्रकल्प मोहिमेचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यावेळी या मोहिमेंतर्गत निवडण्यात आलेल्या अमरावती, रायगड, सोलापूर, औरंगाबाद, चंद्रपूर, नाशिक, गडचिरोली या जिल्ह्यांतील विशेष प्रकल्पांचा आढावा व्हिडीओ कॉन्फन्सिंगच्या माध्यमातून घेण्यात आला. यावेळी संबंधित जिल्हा कार्यालयात उपस्थित असलेल्या आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत प्रकल्प राबविण्यात येणार्‍या अडचणींबाबत चर्चा केली.

या जिल्हा प्रकल्पांना निधी मंजूर आहे. प्रशासकीय मान्यता देखील मिळाल्या आहेत. त्यामुळे कालमर्यादेत ते पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत. या प्रकल्पांमुळे जिल्ह्याच्या विकासाबरोबरच सामान्यांना देखील त्याचा लाभ होणार असल्याने विशेष लक्ष देऊन ते पूर्ण होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अमरावती राजापेठ येथे रेल्वे पूल आणि भुयारी मार्गाचा कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. यावेळी आमदार रवी राणा हे मंत्रालयात तर आमदार सुनील देशमुख अमरावती जिल्हा कार्यालयात उपस्थित होते. रेल्वे पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे. अमृत अभियान अंतर्गत असलेली अमरावती येथील मलनिस्सारण आणि सांडपाण्याची कामे त्वरित पूर्ण करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

उजनी धरणातून सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणार्‍या योजनेच्या प्रगतीचा, औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणार्‍या समांतर जलवाहिनी योजनेचा देखील मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. चंद्रपूर येथील बाबूपेठ उड्डाणपुल, सेवाग्राम विकास आराखडा, गोदावरी नदीपात्राचे रुंदीकरण, गडचिरोलीतील स्टिल प्रकल्प, इंद्रावती नदीवरील पूल या कामांचा मुख्यमंत्र्यांनी माहिती घेत जिल्हा यंत्रणेने अन्य प्रशासकीय यंत्रणांसोबत समन्वय ठेवून काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी नाशिक जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनी नाशिक जिल्हा पर्यटन विकासाच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले वेबपोर्टलचे सादरीकरण केले. जिल्ह्यामध्ये गड-किल्ले, दुर्ग भ्रमंती, धार्मिक पर्यटनाला मोठा वाव असून जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासाबरोबरच नागरिकांना त्याची माहिती होण्याकरिता हे आगळेवेगळे पोर्टल तयार करण्यात आल्याचे राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले.