Mon, Apr 22, 2019 02:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंगारकीला सिद्धिविनायक दर्शन वेळांत बदल

अंगारकीला सिद्धिविनायक दर्शन वेळांत बदल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिरात अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. मंगळवार, 3 एप्रिल रोजी अंगारक योग असल्याने दर्शनासाठी भाविकांची होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी सिद्धिविनायक मंदिर न्यासाने दर्शनाच्या वेळात बदल करण्याचे ठरवले आहे. 

सिद्धिविनायक गणपतीवर अनेकांची श्रद्धा आहे, या श्रद्धेपोटी मुंबईच्या विविध भागातून अनेकजण दर मंगळवारी बाप्पाच्या दर्शनासाठी पायी येत असतात. त्यातच या मंगळवारी 3 एप्रिलला अंगारक योग आल्याने भाविक दर्शनासाठी गर्दी करण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय सध्या महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्या असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी देखील दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. मंदिर परिसरातील गर्दी टाळण्यासाठी व भक्तांना दर्शनाचा लाभ घेता आला पाहिजे याकरिता सोमवारी मध्यरात्रीपासूनच मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला असून मंदिर मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत खुले ठेवण्यात येणार आहे. 

सुमारे पाच ते सहा लाख भाविक दर्शनासाठी येणार असा अंदाज असल्याने मंदिर प्रशासनाकडून मोठी चोख व्यवस्था ठेवण्यात येत असते. अंगारकीनिमित्त महिला व पुरुषांसाठी वेगळ्या रांगांची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिवाय एप्रिलचा कडक उन्हाळा पाहता भक्तांसाठी मंदिर परिसरात जागोजागी मंडप देखील उभारण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एस. के. बोले मार्गावरील आगर बाजार, रवींद्र नाट्यमंदिर कलांगण, सयानी मार्ग, शंकर घाणेकर मार्ग तसेच दत्ता राऊळ मैदानापासून मंदिरापर्यंत रेलिंग उभारण्यात येणार आहेत. 

दर्शन व्यवस्था

महिला व पुरुषांसाठी मुखदर्शन किंवा दुरुन दर्शन घेण्यासाठी एस. के.बोले मार्गावरील आगर बाजार ते सिद्धि प्रवेशद्वार येथून प्रवेश, पुरुष भाविकांसाठी रविंद्र नाट्यमंदिर कलांगण येथील मंडपातून -सयानी मार्ग-शंकर घाणेकर मार्ग, जयभारत हॉटेल-साने गुरुजी उद्यान प्रवेशद्वार येथून पुरुषांना प्रवेश दिला जाणार आहे. तर फक्त महिलांसाठी दत्ता राऊळ मैदान मंडपातून कामना सोसायटी पदपथ येथून सोमवारी मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय अपंग, ज्येष्ठ नागरिक व गरोदर स्त्रिया यांच्याकरिता  सिद्धि प्रवेशद्वाराजवळील संरक्षक भिंतीला लागून असलेल्या आतील बाजूच्या मार्गिकेतून श्रींच्या दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे.

मोफत बससेवा

सिद्धिविनायक मंदिर न्यासातर्फे श्रींच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी सोमवार, 2 एप्रिल रोजी रात्री 12 ते मंगळवार, 3 एप्रिल रोजी रात्री 12 या काळात दादर येथील कबूतर खाना ते रविंद्र नाट्यमंदिर तसेच एलफिन्स्टन स्टेशन ते रविंद्र नाट्यमंदिर यादरम्यान मोफत बससेवा ठेवण्यात आली आहे.

 

Tags : Mulund, Mulund news, Angaraki, Siddhivinayak, Darshan, Time, Change, 


  •