Sat, Jul 20, 2019 12:55होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वडाळा-कासारवडवली मेट्रोसाठी बदलले धोरण

वडाळा-कासारवडवली मेट्रोसाठी बदलले धोरण

Published On: Jun 20 2018 2:01AM | Last Updated: Jun 20 2018 1:37AMठाणे : दिलीप शिंदे

वडाळा ते कासारवडवली मेट्रो लाईनच्या कामाला गती मिळून प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी एमएमआरडीएने आपल्या धोरणात बदल केला आहे. मेट्रोचा मार्ग हा जास्तीत जास्त सरकारी जमिनीमधून काढण्याचे प्रयत्न झाल्याने केवळ 330 जण बाधित होत असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे. त्या सर्व बाधितांची मंगळवारी एमएमआरडीएच्या कार्यालयात जनसुनावणी झाली.    

मुंबईला अधिक वेगवान बनविण्यासाठी मेट्रोचे जाळे निर्माण केले जात आहे. त्याचा एक भाग म्हणून वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या मेट्रोच्या चौथ्या मार्गाला मंजुरी देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जानेवारीमध्ये भूमिपूजन करण्यात आले. मेट्रोचा हा मार्ग 32.32 किलोमीटर लांबीचा असून त्यावर 32 स्टेशन उभारण्यात येणार आहेत. हे सर्व स्टेशन इलिव्हेटेड असतील. या प्रकल्पासाठी 14 हजार 549 कोटी खर्च अपेक्षित आहे. मेट्रोचे दोन कार शेड उभारण्यात येणार असून त्यातील एक घोडबंदररोडवरील ओवळा येथे 20 हेक्टरमध्ये आणि दुसरा विक्रोळीत 15.50 हेक्टर जमिनीवर असेल. परंतु ओवळा येथील शेतकर्‍यांनी आपली जागा देण्यास कडाडून विरोध केल्याने हे कारशेड सरकारी जागेवर बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या. विधिमंडळातही हा मुद्दा गाजला होता. अखेर एमएमआरडीएने पर्यायी जागा शोधण्याचे काम सुरू केले आहे. या परिसरात सरकारी जागाही उपबल्ध आहे. 

दरम्यान, मेट्रो मार्गाच्या दरम्यान बाधित होणार्‍यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्या सर्वे कंपनीच्या अहवालानुसार 330 कुटुंब बाधित होणार आहेत. त्यात व्यावसायिक गाळे देखील आहेत. या सर्व बाधितांना रितसर नोटिसा बजावून त्यांची जनसुनावणी मंगळवारी घेण्यात आली. यावेळी सुमारे 300 बाधितांनी आपले गार्‍हाणे मांडले आणि मुंबईत पुनर्वसनाची मागणी लावून धरली.