Sat, Mar 23, 2019 18:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › आता सरकार बदला : विरोधी पक्षनेत्यांच्या सभेतील सूर

आता सरकार बदला : विरोधी पक्षनेत्यांच्या सभेतील सूर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी

राज्य व केंद्रातील सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. अच्छे दिनाच्या नावाखाली दाखवलेली  स्वप्ने पूर्ण करू न शकणारे हे सरकार आता बदललेच पाहिजे, असा सूर दादर येथे आयोजित केलेल्या विरोधी पक्षांच्या सभेत उमटला. मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने मुंबई मराठी ग्रंथालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात या सभेचे आयोजन करण्यात आले होते.

काँग्रेस नेते आमदार भाई जगताप यांनी भाजप सरकार आल्यापासून गेल्या चार वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील नोकर्‍या घटत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, सरकार आकडेवारी घोषित करून जनतेची दिशाभूल करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, कामगार नेते किरण पावसकर यांनीही सरकारच्या धोरणावर टीका केली. राज्यातील दुष्काळी परिस्थीतीचा  संदर्भ देत त्यांनी सरकारच्या सगळ्या विभागात दुष्काळ असल्याचा टोला लगावला. ते म्हणाले, राज्य सरकारने कर्जमाफी केल्यानंतरही आतापर्यंत 435 शेतकर्‍यांनी आतमहत्या केल्या आहेत. केवळ 20 ते 25 हजार रुपयांच्या तगाद्याला त्रस्त होऊन शेतकरी आत्महत्या करत आहेत, पण सरकारला काहीही देणेघेणे नाही. 

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश रेड्डी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोट ठेवले. काँग्रेस आघाडी सरकारही त्याला जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. रेड्डी म्हणाले, काही वर्षांपूर्वी कामगार सरकारला झुकवीत होते, पण आता कामगारच उद्ध्वस्त झाला आहे. कायद्यात सोयीचा बदल केला करून  कृषी आणि कामगार क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. सगळ्या क्षेत्रात कंत्राटीकरण झपाट्याने केले जात असून भाजपचा एक आमदार सगळीकडे कंत्राटी कामगार पुरविण्याचे कंत्राट घेऊन लाखो रुपये कमवत आहे. काँग्रेस हा मोठा पक्ष असल्याने बदल घडवून आणण्यासाठी या पक्षांनेच पुढाकार घ्यावा, अशी विनंतीही त्यांनी केला.

मुंबई जनता दलाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी महागाई, शिक्षण क्षेत्रातील अंदाधुंदी आणि बेघरांकडे दुर्लक्ष असल्यामुळे राज्य सरकारविरोधात असंतोष असल्याचा दावा केला. नारकर म्हणाले,  देशातील जनतेने मागणी केली नसताना केंद्र व राज्य सरकारने बुलेट ट्रेन आणण्याचे षडयंत्र आखले आहे. त्याऐवजी झोपड्या तोडून मुंबईकरांना घरे दिली पाहिजे होती. मुंबईतील झोपडपटट्या तोडून चांगली घरे बांधण्यासाठी केवळ एक लाख कोटींची गरज आहे. 

आपल्या अध्यक्षीय भाषणातून मराठी भाषा केंद्राचे अध्यक्ष डॉ.दीपक पवार म्हणाले, चुकीची धोरणे राबविल्यामुळे हा कार्यक्रम करण्याची सरकारने आम्हाला संधी दिली. मराठी भाषा संवर्धन आणि या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, म्हणून आपण सरकार दरबारी भांडत आहोत. पण हे सरकार केवळ प्रयत्न करत असल्याचा देखावा निर्माण करत आहे. विरोधक या प्रश्नांची सोडवणूक करतील, या भावनेने आपण हा कार्यक्रम आयोजित केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

Tags : mumbai news,Change, government now, Opposition leaders,


  •