Mon, Jun 24, 2019 17:35होमपेज › Mumbai-Thane-Raigad › चांदवड शस्त्रसाठा : आरोपीच्या पित्यास खंडणीप्रकरणी अटक

चांदवड शस्त्रसाठा : आरोपीच्या पित्यास खंडणीप्रकरणी अटक

Published On: Dec 28 2017 1:30AM | Last Updated: Dec 28 2017 12:38AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातून मुंबईत चोरट्या मार्गाने घातक शस्त्रसाठ्याप्रकरणी अटकेत असलेला कुख्यात गुंड सुका अकबर पाशा ऊर्फ साहिल खान याचे वडिल अकबर बादशहामियाँ कैमत जान (53) याला मंगळवारी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अकबर जान याची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असून त्याचे दाऊद आणि छोटा शकीलशी संबंध असल्याचे बोलले जाते. त्याच्याविरुद्ध आठहून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले. 

अकबर जान हा शिवडी परिसरात राहत असून तिथेच त्याच्यासह त्याचा मुलगा सुका अकबर पाशा याची प्रचंड दहशत आहे. परिसरातील व्यापार्‍यांना घातक शस्त्रांचा धाक दाखवून खंडणीसाठी धमकी देणे, दहशत निर्माण करणे अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची या पिता-पूत्रांविरुद्ध नोंद आहे. अशाच एका गुन्ह्यांत सुकाला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्याच्या सुटकेसाठी अकबरने स्थानिक परिसरातील व्यापार्‍यांकडे मोठ्या प्रमाणात खंडणीसाठी वसुली सुरु केली होती. यातील तक्रारदाराचा शिवडी परिसरात एक दुकान असून त्यांच्याकडेही अकबरने पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते, याच दरम्यान सुका हा जामिनावर जेलमधून बाहेर आला होता. बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा त्यांच्याकडे एक लाख रुपयांची खंडणीची मागणी करुन ही रक्कम दिली नाहीतर संपूर्ण कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. इतकेच नव्हे तर या व्यापार्‍यासह त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या कार्यालयात नेऊन घातक शस्त्रांच्या जोरावर धमकाविण्यात आले होते.

15 डिसेंबरला सुकासह त्याच्या दोन सहकार्‍यांना चांदवड येथे घातक शस्त्रांसह पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर अकबरने तक्रारदार व्यापार्‍यांना त्यांच्याच टिपमुळे सुका पकडला गेला, आता एक लाख रुपये दिले नाहीतर तिथे व्यवसाय करता येणार नाही अशी धमकी दिली होती. या धमकीनंतर या व्यापार्‍याने आरएके मार्ग पोलिसांत धाव घेऊन तिथे घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.