Wed, Jul 24, 2019 12:44होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात चंद्रपूर ठरले सर्वात ‘हॉट’

राज्यात चंद्रपूर ठरले सर्वात ‘हॉट’

Published On: Mar 25 2018 2:20AM | Last Updated: Mar 25 2018 1:24AMमुंबई : प्रतिनिधी 

उन्हाळा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता तापमान आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. परिणामी, मुंबईकरांना वाढता उन्हाळा असह्य होत असून, रात्रीच्या उकाड्यातही वाढ होत आहे. मुंबईसह पुणे नाशिककरांनाही उष्णतेचा तडाखा बसणार आहे.

मुंबई शहर आणि उपनगरातील मळभ दूर झाल्यावर आता मुंबईकरांना उन्हाचे चटके बसू लागले असून, उत्तरोत्तर कमाल तापमानाचा पारा वरचढच होत चालला आहे. शनिवारी सांताक्रुझ येथे तापमान कमाल 30.7 आणि किमान 21.2 तर कुलाबा येथे कमाल 31.2 आणि किमान 23.0 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपुर येथे 39.6, तर सर्वात कमी किमान तापमान सातारा येथे 14.4 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. मागील 24 तासांत राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानामध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये किंचित वाढ तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.

 येत्या 25 मार्च रोजी कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर 26 मार्च रोजी गोव्यासह राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच 27 मार्चला पुन्हा मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून राज्याच्या उर्वरीत भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.  

Tags : Mumbai, Chandrapur to be the most hot in the state