Thu, Apr 18, 2019 16:03होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जैतापूर अणुऊर्जा हटावसाठी तीव्र लढा होण्याची शक्यता

जैतापूर अणुऊर्जा हटावसाठी तीव्र लढा होण्याची शक्यता

Published On: Jul 31 2018 1:37AM | Last Updated: Jul 31 2018 1:08AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात जोरदार पेटले असताना, कोकणातील पर्यावरणाला मोठा धोका निर्माण करणार्‍या रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पही कायमचा हटवा, या मागणीसाठी पुढच्या महिन्यात आंदोलन केले जाणार आहे.

2008 च्या आंतरराष्ट्रीय करारानुसार, फ्रान्सच्या अरेवा कंपनीबरोबर न्युक्‍लिअर पॉवर कॉर्पोरेशननेे करार केला होता. कोकणात 980 हेक्टर जमिनीवर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे काम केंद्र सरकारने स्थानिक लोकांच्या  विरोधाला न जुमानता रेटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्थानिकांनी जोरदार आंदोलने केली. या  आंदोलनात 10 एप्रिल 2011 रोजी तबरेज सायेकर या तरुणाचा मृत्यू झाला. राष्ट्रीय हिताचा प्रकल्प जाहीर करून डिसेंबर 2013 पर्यंत स्थानिकांच्या जमिनी बळजबरीने अधिग्रहण करण्यात आल्या.  जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प म्हणून जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाकडे पाहिले जाते. एक हजार 650 मेगावॅट क्षमतेच्या 6 अणुभट्ट्या या ठिकाणी असणार आहेत. मात्र, जपानमधील फुकशिमा येथील अणुऊर्जा प्रकल्पामुळे झालेल्या मोठ्या दुर्घटनेनंतर  राज्यातील जैतापूर अणुऊर्जा  प्रकल्पाविरोधात स्थानिक कोकणातील जनतेचा विरोध अधिक तीव्र झाला होता. 

केंद्र सरकारचे पाठबळ असतानाही गेल्या पाच वर्षात ज्या गतीने काम व्हायला हवे होते, त्यापद्धतीने काम होताना दिसत  नाही. याउलट ज्या फ्रान्सच्या अरेवा कंपनीशी करार केला होता ती कंपनीत आर्थिक संकटात सापडल्याने फ्रान्स सरकारने ईडीएफ या कंपनीला काम दिले परंतु, ही कंपनी ही  खर्च करताना सावध पावले उचलत असल्याचे सांगण्यात येते. त्याचा परिणाम म्हणून आज जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू आहे. 

अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आर्थिक कोंडीची समस्या पुढे आली असली तरी, हा प्रकल्प कोणत्याही परिस्थिती पूर्ण होऊ देणार नाही. नाणार रिफायनरीपेक्षा जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा संपूर्ण कोकणाला घातक आहे. एखादी दुर्घटना झाल्यास कोकणाचे न भरून येणारे नुकसान होऊ शकते. या प्रकल्पामुळे शेतकरी, मच्छीमार संकटात येणार असून पर्यावरणाला मोठा धोका आहे. त्यामुळे, नाणार रिफायनरी विरोधातील आंदोलनाबरोबर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील आंदोलन तीव्र केले जाणार असल्याचे स्थानिक जनतेकडून सांगण्यात येते. मार्च 2018 मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन हे भारत दौर्‍यावर असताना त्यांनी भारताबरोबर केलेल्या 14 करारापैकी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या कामाला गती देण्यावर भर दिला होता. मात्र, प्रति युनिट किती दर असावा याबाबत अद्याप एकमत झाले नसल्याचे समजते. अणुऊर्जा प्रकल्पामुळे कोकणाचा र्‍हास होवू शकतॉे  ही बाब सोशल मीडियामुळे संपूर्ण कोकणातील जनतेपुढे पोहोचली आहे. त्यामुळे, पुढील महिन्यापासून जैतापूर प्रकल्पाविरोधातील आंदोलनातील आंदोलन तीव्र केले जाणार असल्याची माहिती कोकण जनहक्क समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण यांनी दिली.