Tue, Apr 23, 2019 00:34होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कुलगुरुंची निवड यूजीसीच्या नियमानुसारच हवी

कुलगुरुंची निवड यूजीसीच्या नियमानुसारच हवी

Published On: Feb 13 2018 2:23AM | Last Updated: Feb 13 2018 1:29AMमुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापकांपासून, प्राध्यापक आणि विभागप्रमुखांची निवड करताना युजीसीच्या नियमानुसार केली जाते. मग मात्र विद्यापीठातील सर्वोच्च अशा कुलगुरू पदाची निवड करताना युजीसीच्या नियमानुसारच व्हावी या उद्देशाने न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागत असल्याचे मत मुंबई विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉ. ए.डी.सावंत यांनी  व्यक्त केले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडी संदभार्त गठीत करण्यात आलेल्या शोध समितीवर आक्षेप नोंदविताना काही दिवसांपूर्वी ए.डी.सावंत यांनी राज्यपालांकडे पत्र लिहले होते. मात्र या पत्राची गंभीर दखल न घेतल्याने याविरोधात अखेर सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंच्या निवडीसाठी नेमण्यात आलेल्या शोध समिती आणि त्या प्रक्रियेवर असलेल्या आक्षेपांच्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी पत्र लिहले होते. 

तब्बल चारवेळा पत्र लिहल्यानंतरही याबाबत कोणताही दखल घेतली नाही. त्यामुळे याप्रकरणी न्यायालयाची लढाई चढविण्याचा निर्णय घेतला. मुळात विद्यापीठातील जवळपास सर्वच महत्वांच्या पदावर करण्यात येणारी नियुक्ती ही युजीसीच्या नियमानुसार करण्यात येते. मग कुलगुरूंसाठी युजीसीचे नियम का डावलण्यात येते. कुलगुरूंच्या निवडीसाठी नेमण्यात आलेल्या शोध समितीत सनदी अधिकारी, निवृत्त न्यायधीश आणि शास्त्रज्ञ इच्छुकांची शैक्षणिक अहर्ता कशी काय ओळखू शकतात. याबाबत ही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे कुलगुरू निवडीसाठी युजीसीच्या नियमांचे पालन होणे गरजेचे आहे असे ए.डी. सावंत यांनी नमूद केले आहे.