Sun, Jul 21, 2019 15:07
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › बुलेट ट्रेनच्या भूसंपादनास गोदरेज ग्रुपचे हायकोर्टात आव्हान

बुलेट ट्रेनच्या भूसंपादनास गोदरेज ग्रुपचे हायकोर्टात आव्हान

Published On: Jul 10 2018 1:17AM | Last Updated: Jul 10 2018 1:05AMमुंबई : प्रतिनिधी

मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी गोदरेज ग्रुपची विक्रोळी येथील मोक्याची जमीन संपादित करण्याच्या प्रस्तावास उद्योग समूहाने हायकोर्टात आव्हान दिले आहे. बुलेट ट्रेनचा मार्ग बदलल्यास उद्योग समूहास आपल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी 8.6 एकर जमीन उपलब्ध होवू शकते. यामुळे  संबंधित यंत्रणेला बुलेट ट्रेनचा मार्ग बदलण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी गोदरेजतर्फे करण्यात आली आहे.

बुलेट ट्रेनच्या प्रस्तावानुसार मुंबई ते अहमदाबाद दरम्यान 508.17 किमीचा रेल्वेमार्ग तयार करावा लागणार असून यातील 21 किमीचा मार्ग जमिनीखालून जाणार आहे. जमिनीखालील बोगद्यातून जाणार्‍या मार्गाचा एंट्री पॉईंट विक्रोळी येथील गोदरेज यांच्या भूखंडात येत आहे. या जागेतील सुमारे एक एकरच्या भूखंडावर बुलेट ट्रेनच्या भुयारी मार्गासाठी व्हेंटिलेशन डक्टस उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी ही जमीन संपादित करण्यात येणार आहे.

सध्याच्या बाजारभावाने या भूखंडाची हजारो कोटी रुपये किंमत असल्याने भूखंड बुलेट ट्रेनसाठी देण्यास गोदरेजचा जोरदार विरोध आहे. यामुळे ट्रेनचा मार्ग बदलावा अशी विनंती करणारी उच्च न्यायालयात याचिका केली आहे. गेल्या महिन्यात यासंदर्भात सादर करण्यात आलेल्या याचिकेवर हायकोर्टात 31 जुलै रोजी एक सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. बुलेट ट्रेनच्या या प्रकल्पास गुजरात तसेच महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनीही विरोध केला आहे. गुजरातमधील चार शेतकर्‍यांनी या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यास विरोध केला असून याबाबत त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.