Tue, May 21, 2019 22:42होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यापुढे सायबर गुन्हेगारीचे आव्हान

राज्यापुढे सायबर गुन्हेगारीचे आव्हान

Published On: Mar 16 2018 1:26AM | Last Updated: Mar 16 2018 1:02AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यापुढे आर्थिक आणि सायबर गुन्हेगारी रोखण्याचे फार मोठ आव्हान आहे. मागील वर्षभरात सायबर गुन्ह्यांच्या 4035 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यातील 1037 गुन्हे उघडकीस असून 1367 व्यक्तींना अटक झाल्याची माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधान परिषदेत दिली. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत, मात्र या संदर्भातील कायद्याचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे सायबर गुन्ह्यांच्या सिद्धतेचे प्रमाण कमी असून ते वाढविण्याचा प्रयत्न आगामी काळात केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद आदी ठिकाणी सायबर गुन्ह्यांची संख्या मागील काही वर्षांत वाढली असून अशा प्रकारच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात यावी. गुन्हा सिद्धतेचे प्रमाण वाढवून आरोपींना शिक्षा होण्यासाठी सरकार करत असलेल्या कार्यवाही बद्दल काँग्रेसचे सतेज पाटील यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री रणजित पाटील यांनी सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात विविध स्तरावर उपाययोजना सुरू आहेत. पुढच्यावर्षी पासून एम.एच.सर्ट (महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प) अंतर्गत समाजमाध्यमांद्वारे पसरणार्‍या अफवांना चाप लावण्यात येईल. या प्रकल्पासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात येत असून पोलिसांची स्वतंत्र टीम यासाठी देण्यात येईल. 650 कोटी एकंदर सायबर सुरक्षेच्या कामासाठी ठेवण्यात आल्याचे सांगितले.