Wed, Jun 26, 2019 17:33होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई-नाशिक महामार्गावर चक्काजाम

मुंबई-नाशिक महामार्गावर चक्काजाम

Published On: Mar 09 2018 2:06AM | Last Updated: Mar 09 2018 1:13AMकसारा : शाम धुमाळ

वनहक्क कायद्याची अंमलबजावणी, नद्या जोड प्रकल्पाचा प्रश्‍न, बोंडअळी, गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई यासह विविध मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने 12 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य विधानभवनावर घेराव आंदोलन व मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त 6 मार्च रोजी नाशिक येथून रस्त्यावरचे डांबराचे चटके सोसत व डोक्यावर तळपत्या सूर्याच्या मारा सहन करीत हा मोर्चा गुुरुवारी कसार्‍यात दाखल झाला. या मोर्चेकर्‍यांनी मुंबई-नाशिक महामार्गावर चक्का जाम करून पथनाट्य व शेतकरी कष्टकरी यांची व्यथा मांडली.
आमदार कॉ. जे. पी. गावीत, कॉ. अशोक ठवळे, कॉ. डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथून निघालेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले असून, वयोवृद्ध शेतकरी, महिला यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. मुंबईपर्यंतच्या प्रवासादरम्यान या मोर्चात 60 ते 70 हजार शेतकरी लाल बावट्याच्या निशाणीखाली सहभागी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

मोर्चाचे नेतृत्व करणार्‍या आ. गावीत यांनी शासनावर निशाणा साधत केंद्र व राज्य शासनाने हाती घेतलेल्या बुलेट ट्रेनसह अन्य योजनांना विरोध केला. एकीकडे शेतकरी कर्जमाफीसाठी टाहो फोडत आहे. शासन फक्त आश्‍वासन देऊन शेतकर्‍याला गाजर दाखवत असल्याचा आरोप आ. गावीत यांनी केला. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकर्‍यांसह आदिवासी-दलितांचे अनेक प्रश्‍न, मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या त्वरित मान्य व्हाव्यात यासाठी नाशिक-मुंबई लाँग मार्च काढत सरकारला कोंडीत पकडणार असल्याचे कॉ. ठवळे व कॉ. नवले यांनी सांगितले. यावेळी त्र्यंबकेश्‍वर येथील आधारतिर्थ आश्रमात शिक्षण घेणार्‍या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या 10 अनाथ मुला-मुलींनी आपल्या व्यथा मांडल्या. 

या मोर्चाला कसारा येथून राष्ट्रवादीचे शरद वेखंडे यांनी जाहीर पाठिंबा दिला. दरम्यान, मोर्चेकर्‍यांसाठी पहाटे 5 वाजल्यापासून कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रवीण कोल्हे यांनी मोठ्या प्रमाणात महामार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. एक मार्ग मोर्चेकर्‍यांसाठी उपलब्ध करून महामार्ग व वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवली. तर कसारा येथील आरोग्य पथकाच्या डॉ. रेखा सोनवणे आपल्या कर्मचार्‍यांसह यावेळी कार्यरत होत्या. दरम्यान, हजारोंच्या संख्येने येणारा लाल बावट्याचा हा मोर्चा मुंबईत दाखल झाल्यास मुंबईतील वाहतूक व्यवस्थेसह अन्य व्यवस्थापनेचा बोजवारा उडण्याची शक्यता असून, 12 मार्च रोजी विधान भवनावर धडकणार्‍या या मोर्चामुळे पोलीस प्रशासनावर देखील ताण येणार आहे.