Tue, Jul 23, 2019 11:23होमपेज › Mumbai-Thane-Raigad › भुजबळ छोडो आंदोलन करा

भुजबळ छोडो आंदोलन करा

Published On: Feb 06 2018 1:47AM | Last Updated: Feb 06 2018 1:23AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा, बेनामी तसेच उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणी गेल्या 21 महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी सोमवारी मुंबईत राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी आता भुजबळ छोडो आंदोलन करायला हवे, असा सल्‍ला राज यांनी भुजबळ समर्थकांना दिला. 

महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा, बेनामी तसेच उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणी छगन भुजबळ यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले नाहीत. जामिनासाठी प्रयत्न करूनही त्यांना तुरुंगात राहावे लागले आहे. राजकीय आकसापोटी त्यांच्यावर कारवाई केल्याचा आरोप भुजबळसमर्थकांनी या भेटीत केला. मार्च महिन्यात मुंबईत आम्ही मेळावा घेणार असल्याची माहिती भुजबळसमर्थकांनी राज ठाकरे यांना दिली.

भुजबळ तुरुंगात असल्यामुळे नाशिकचा विकास थांबला आहे. नाशिक जिल्ह्याकडे लक्ष देणारा भुजबळांशिवाय नेता नाही. त्यामुळे त्यांची लवकरात लवकर तुरुंगातून सुटका होणे गरजेचे आहे असे गार्‍हाणे भुजबळसमर्थकांनी राज यांच्याकडे मांडले. त्यावर बोलताना राज म्हणाले, भुजबळांना याआधीच जामीन मिळायला हवा होता.आता त्यांना सोडवण्यासाठी भुजबळ जोडो नाही तर भुजबळ छोडो आंदोलन व्हायला हवे.

दोन वर्षांपासून सुरू असलेल्या सुडाच्या राजकारणाचे भुजबळ बळी ठरले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी आम्ही सर्व पक्षांच्या नेत्यांना भेटत आहोत. मुख्यमंत्र्यांचीही भेट आम्ही घेणार आहोत. त्याचबरोबर नाशिकमध्ये ‘अन्याय पे चर्चा’ सुरू केली आहे, असे समर्थकांनी सांगितले.

माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार जयंत जाधव, नरहरी झिरवळ, शिरीष कोतवाल यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शहर अध्यक्ष अंबादास खैरे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष मायावती पगारे, दिगंबर गीते आदींचा या भेटीमध्ये समावेश होता.