Tue, Apr 23, 2019 21:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › छगन भुजबळ जे.जे. रुग्णालयात

छगन भुजबळ जे.जे. रुग्णालयात

Published On: Mar 05 2018 1:50AM | Last Updated: Mar 05 2018 1:32AMमुंबई : प्रतिनिधी

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी म्हणजेच मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा एकदा जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोटदुखी आणि दम्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना जेजेत सीसीयूमध्ये ठेवण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले.

छगन भुजबळ यांच्या सिटी स्कॅन आणि सोनोग्राफीच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. भुजबळ यांच्या स्वादुपिंडाला संसर्ग झाल्याने भुजबळ यांना पोटदुखीचा त्रास होत असल्याचे चाचण्यांवरून स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांना श्वास घेण्यासही थोडा त्रास होत आहे, त्यामुळे भुजबळ यांना कार्डिअ‍ॅक केअर युनिटमध्ये ठेवण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

छगन भुजबळ यांना शनिवारी पोटदुखी, मधुमेह आणि दम्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ आर्थर रोड तुरुंगातून जेजे रुग्णालयात हलविण्यात आले. जेजेत आधी त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना सीसीयूत हलविण्यात आले. आता त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. भुजबळांना अन्ननलिका आणि आतड्यांचाही आजार असल्याचे सांगण्यात आले. प्रकृती बिघडत असल्याने मागच्या वर्षी भुजबळ यांना 35 पेक्षा जास्त वेळा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.