Wed, Jul 17, 2019 20:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उद्यापासून मुंबईत दूधटंचाई अटळ

उद्यापासून मुंबईत दूधटंचाई अटळ

Published On: Jul 18 2018 2:18AM | Last Updated: Jul 18 2018 2:18AMनवी मुंबई : राजेंद्र पाटील 

राज्यात सुरू असलेले दूध आंदोलन चिघळले असून त्याचा फटका आता मुंबईसह ठाणे, रायगड आणि नवी मुंबईला दररोज लागणारा 40 ते 50 लाख लिटर दुधाचा साठा आता कुठल्याच दूधसंघाच्या मुंबईत पुरवठा करणार्‍या कंपनीत शिल्‍लक नाही. त्यामुळे व्यवस्थापनाकडे शिल्लक असलेल्या दुधावर मुंबईकरांना पुरवठा करणे अशक्य आहे. याचा थेट परिणाम उद्या गुरुवारपासून मुंबईत दिसू लागेल, अशी माहिती गोकुळ दूध संघाचे व्यवस्थापक दयानंद पाटील यांनी पुढारीला दिली. 

दूध आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी बुधवारी गोकुळ दूध संघाचे 50 टक्के दूध संकलन कमी झाले असून त्यांचा पुरवठा 7 लाख लिटर दुधाचा असताना त्याकडे केवळ सव्वा लाख लिटर दूध मंगळवारी रात्री शिल्लक राहिले. तर वारणाचीही अवस्था तशीच असून त्यांच्याकडे बुधवारी पुरवठा होईल एवढेच 1 लाख 60 हजार लिटर दुधाचा साठा शिल्लक रहिला आहे. मुंबईसह उपनगर आणि नवी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याला लागणारा साठा मुबलक प्रमाणात नसल्याने सर्वच दुध कंपन्या पुरवठा करणार्‍या टँकरची वाट पाहत आहेत.

गोकूळचा मुंबईतील दुधाची विक्री ही 7 लाख लिटर आहे. दोन दिवस पुरले एवढा साठा त्याच्याकडे होता. सोमवारी रात्री 35 टँकर आणि मंगळवारी आठ टँकर नवी मुंबईतील वाशी गोकूळ दुध संघात आले. त्याची पॅकिंग करुन दोन दिवस विक्री केली. मंगळवारी आलेल्या आणि शिल्लक साठ्यात बुधवारसाठी मुंबईकरांना दुधाचा पुरवठा पुर्ण केला. मात्र गुरुवारीसाठी सात लाख लिटर दुधापैकी केवळ सव्वा लाख लिटर दुध शिल्लक रहिल्याने गोकूळ दुधसंघ ही अडचणीत आला आहे. 

वारणा दुधाची विक्री 1 लाख 80 हजार दररोज असून त्यांच्याकडेही बुधवारी पुरवठा होईल एवढाच साठा होता. शिल्लक रहिलेले दुध आणि सोमवारी आलेल्या टँकर यावर त्यांनी बुधवारचा पुरवठा भागवला. मात्र मंगळवारी एकही टँकर वारणात आले नाही. त्यामुळे गुरुवारसाठी त्यांच्याकडे दुध शिल्लक नाही. विशेष म्हणजे मंगळवारी पश्‍चिम महाराष्ट्रातील 50 टक्के शेतकर्‍यांनीच दुध केंद्रावर पोहचते केले नाही. त्याचा ही फटका बसणार आहेच. आता अमूल दुधसंघाकडून येणार्‍या दुध पुरवठ्यावरच मुंबईकरांचा गुरुवार अवलंबून आहे. 

रायगड, ठाणे आणि मुंबईत मोठ्या प्रमाणावर तबेले असून त्याठिकाणाही खाजगी दुध डेअरी मालकांनी दुधाचा अतिरिक्त साठा दोन दिवसांपासून करुन ठेवला आहे. मात्र त्या दुधाचा दर्जा, गुणवत्ता कुणी तपासली हे देखील आता महत्वाचे आहे. 

लहान 3 ते 4 हजार लिटर दुधाची  क्षमता असलेल्या टँकरमध्ये दुध भरुन ते शहरातील डेअरीवर वाटप केले जात आहे.