Thu, Apr 25, 2019 03:30होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मालगाडी घसरून मरे तीन तास ठप्प

मालगाडी घसरून मरे तीन तास ठप्प

Published On: Dec 07 2017 2:15AM | Last Updated: Dec 07 2017 2:10AM

बुकमार्क करा

ठाणे : प्रतिनिधी

मध्य रेल्वेचा खोळंबा सुरूच असून, बुधवारी सायंकाळी 5 च्या सुमाराला कळवा येथील जलद मार्गावरून नवी मुंबईकडे जाण्यासाठी क्रॉसिंग करीत असताना मालगाडीचे मागचे पाच डबे घसरले. यामुळे जलद मार्गावरील वाहतूक सेवा तब्बल तीन तास ठप्प झाली होती.  त्यानंतर 60 लोकल फेर्‍या रद्द करण्यात आल्या. त्याचा फटका चाकरमान्यांना बसला.

मालगाडी कल्याणहून नवी मुंबईच्या दिशेने जात होती. ही मालगाडी नेहमीप्रमाणे जलद मार्गावरून कळव्यातील पारसिक बोगद्याजवळील आनंद नगर-भोला नगर परिसरातील नवी मुंंबईकडे जाण्यासाठी रुळ बदल असताना मालगाडीचे मागील पाच डबे घसरले. त्यातील एक डबा रूळावरून खाली उतरल्याने मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून मोटरमनने मालगाडी जागीच थांबवली. सुदैवाने घसरलेल्या मालगाडीचे डबे हे आनंद नगर आणि भोला नगर या नागरी वस्ती गेले नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.

ट्रांन्स हार्बरवर लोकलमधून धूर आल्याची अफवा 

ट्रांन्स हार्बर मार्गावर ठाणे रेल्वे स्थानक येथून पनवेलकडे जाणार्‍या लोकलमधून धूर आल्याची अफवा पसरल्याची घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. मोटरमनच्या लक्षात येताच लोकल पाच मिनीटे थांबविण्यात आली. यामुळे नक्की काय झाले हे कुणालाच समजत नसल्याने प्रवाशांमध्ये थोडा वेळ गोंधळाचे वातावरण होते.