Wed, Apr 24, 2019 11:57होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पारसिक बोगद्यात समाजकंटकांचा धुडगूस

पारसिक बोगद्यात समाजकंटकांचा धुडगूस

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

डोंबिवली : वार्ताहर

मध्य रेल्वेच्या कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान असलेल्या पारसिक बोगद्यातून धावणार्‍या जलद लोकलवर परिसरातील उन्मत्त समाजकंटकांकडून वस्तू फेकून प्रवाशांना जखमी करण्याचे सत्र सुरूच आहे. गेल्या आठवड्यात मंगळवार आणि गुरुवारी दोन प्रवासी महिलांवर अशाचप्रकारे अवजड वस्तू, काचेच्या बाटल्या फेकून त्यांना जबर जखमी केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. विद्या कोळी आणि भावना अशी त्यांची नावे असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेहमीच घडणार्‍या या घटनांमुळे महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या उन्मत्त समाजकांटकांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.

डोंबिवलीत राहणार्‍या विद्या कोळी या वडाळा येथील एमटीएनएल कार्यालयात नोकरी करतात. त्या मंगळवारी सायंकाळी बदलापूर जलद लोकलने डोंबिवलीच्या दिशेने येत होत्या. पारसिक बोगद्यातून लोकल जात असताना बोगद्यापासून थोड्या अंतरावर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने लोखंडी रॉडसारखी अवजड वस्तू वेगाने महिला डब्याच्या दिशेने भिरकावली. ही वस्तू विद्या यांच्या पायाला लागल्याने त्या जबर जखमी झाल्या. डोंबिवलीतील प्रवासी प्राजक्ता व इतर महिलांनी जखमी विद्या यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. पायाच्या घोट्यावरील भागात फ्रॅक्चर झाल्याने विद्या यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांच्या पायात सळई (रॉड) टाकण्यात आली आहे. असाच प्रकार गुरुवारी सायंकाळी पारसिक बोगद्याजवळ घडला. त्यात भावना नावाच्या प्रवासी तरुणीवर बाटलीने हल्ला चढविण्यात आला. यात तिच्या चेहर्‍यावर मोठी जखम झाली. रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असला तरी त्या परिसरात पोलिसांनी गस्त घालावी, बोगद्यावरील दगडफेक्यांना आवर घालावा, हल्लेखोरांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी संतप्त प्रवाशांकडून केली जात आहे. 

मध्य रेल्वेतून प्रवास करणार्‍या महिलांच्या सुरक्षेसाठी काम करणार्‍या तेजस्वी महिला संघटनेने गृहराज्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर यासंदर्भात एक संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली. यात पारसिक परिसरात संरक्षण भिंत उभारणे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, संयुक्त पेट्रोलिंग आणि जनजागृतीचे आदेश राज्यमंत्र्यांनी दिले. राज्याचे पोलीस महासंचालक, ठाणे जिल्हा शहर पोलीस आयुक्त, लोहमार्ग पोलीस आयुक्त, मध्य रेल्वेचे पोलीस महानिरीक्षक व रेल्वे सुरक्षा दलास यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र तरीही अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याने उन्मत्त हल्लेखोरांचे धाडस वाढत आहे.

वर्षभरात 5 दगडफेकीच्या घटना

पारसिक बोगद्याच्या परिसरातून लोकलवर फिरकावलेल्या दगडामुळे मुकुंद काकोडकर या तरुणाचा डोळा कायमचा निकामी झाला. मुकुंद हा डोंबिवलीतील गोग्रासवाडीत राहतो. मुंबईतील स्पेक्ट्रा मोटर्समध्ये तो सेल्स एक्झिक्युटिव्हचे काम करतो. मिठीबाई कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण करणारा मुकुंद हा घरातला एकमेव कमावता मुलगा आहे. मात्र लोकल मार्गाजवळच्या टवाळखोरांमुळे त्याला डोळा गमवावा लागला आहे. पारसिक बोगद्याजवळच्या झोपडपट्ट्यांमधून लोकलवर दगडफेक करण्याचा प्रकार नवा नाही. गेल्या वर्षभरात या परिसरात दगडफेकीच्या 5 घटना घडल्या आहेत. या परिसरातील लोकलमार्गालगत असलेली संरक्षक भिंत फार उंच नाही. त्यामुळे झोपडपट्टीतील लहान मुलेही लोकलवर दगड फेकतात.

त्याशिवाय लोकलमधील महिलांच्या बॅग हिसकावून घेणे किंवा मोबाइल चोरी करण्यासाठी या भागातून दगडफेकीचे किंवा हातावर काठी मारण्याचे प्रकारही सातत्याने होत असतात. परंतु रेल्वेच्या काही अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार या भागात बांधकाम सुरू असून तेथील जेसीबी मशीनमुळे उडालेला दगड प्रवाशांना लागू शकतो. मात्र प्रवासी मंडळींनी हा अभिप्राय हास्यास्पद असल्याचे सांगितले. ज्या मुकुंदने डोळा गमावलाय तो लोकलच्या दारात उभ्या असलेल्या एका व्यक्तीच्या मागे उभा होता. उडालेला दगड अशा पद्धतीने आत येणार नाही. कुणी तरी तो जाणूनबुजून मारल्याचा दावा मुकुंदचा मित्र केवल सिंग याने केला आहे.

फटका गँगचीही दहशत

लोकलच्या दारात उभे असताना रुळांलगतच्या खांबावर चढून बसलेल्या चोरट्याने मारलेल्या फटक्यामुळे कल्याणमधील द्रविता सिंग या तरुणीला हाताची बोटे व पाय गमवावा लागला. फेब्रुवारीत सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळ ही घटना घडली होती. यानंतर उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांमध्ये फटका गँगची मोठी दहशत निर्माण झाल्याचे समोर आले आहे. लोकलच्या दारावरील बेसावध प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्याच्याकडील मोबाईल व अन्य साहित्य लुटून नेणारी फटका गँग मध्य रेल्वेच्या बहुतांश रेल्वे स्थानकांच्या हद्दीत कार्यरत आहे.  गतवर्षी अशा चोरट्यांनी लुटल्याच्या 95 घटनांची मध्य रेल्वे पोलिसांकडे नोंदही झाली आहे. तथापि आतापर्यंत यातील केवळ 20 गुन्ह्यांचा तपास लागला आहे. विशेष म्हणजे या फटका गँगचा बीमोड करण्याऐवजी प्रवाशांनाच सतर्क राहण्याचे आवाहन करण्याची मागणी रेल्वे सुरक्षा दलाकडून (आरपीएफ) रेल्वे प्रशासनाकडे केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. 


  •