Thu, Mar 21, 2019 11:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकलचा चक्‍काजाम

लोकलचा चक्‍काजाम

Published On: Mar 21 2018 2:19AM | Last Updated: Mar 21 2018 2:19AMमुंबई : प्रतिनिधी

रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दादर-माटुंगा रेल्वे स्थानकानजीक केलेल्या रेलरोकोमुळे मध्य रेल्वेची लोकलसेवा तब्बल तीन तास बंद पडली. मंगळवारी सकाळी 7 वाजता अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे कामावर जाणार्‍या मुंबईकरांचे तसेच बाहेरगावाहून आलेल्या रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी दगडफेक केली त्यात अधिकार्‍यांसह 11 पोलीस  कर्मचारी जखमी  झाले.  दरम्यान रेल्वेकडून चर्चेचे आश्‍वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

मागील तीन ते चार वर्षांपासून सातत्याने आम्ही आमच्या मागण्यांंसाठी रेल्वेकडे पाठपुरावा करत आहोत. पण आम्हाला न्याय मिळाला नाही. शेवटी नाईलाजास्तव आम्ही रेल रोको केला, अशी बाजू मांडत आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी रेलरोकोमुळे झालेल्या त्रासासाठी मुंबईकरांची माफी मागितली.

या आंदोलनामुळे सीएसटीच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. रेल रोकोची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत आणि तसे लेखी आश्‍वासन मिळत नाही, तोपर्यंत रेल्वे रुळ सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतला. सुमारे तीन साडेतीनतास हा गोंधळ सुरू होता. शेवटी पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीमार केल्याने विद्यार्थ्यांनी लोकलवर दगडफेकही केली.

प्रवास करण्यासाठी निवडला पर्यायी मार्ग

विद्यार्थ्यांनी मध्य रेल्वेवरील माटुंगा ते दादरदरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडल्याने एकही लोकल पुढे सरकली नाही. त्यामुळे लोकलसह एक्स्प्रेस गाड्याही खोळंबल्या. कुर्ल्याहूनच ठाणे, कर्जत, कसारा लोकल सुरु होत्या. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणार्‍या प्रवाशांना कुर्ल्यातच उतरावे लागले. त्यातच ओला आणि उबेरने संप पुकारल्याने प्रवाशांच्या अडचणीत अजूनच भर पडली. सीएसएमटीच्या दिशेला जाण्यासाठी प्रवाशांनी घाटकोपर ते अंधेरी असा मेट्रो प्रवास करत चर्चगेटला पोहोचून सीएसएमटी गाठले. बेस्ट प्रशासनाने कुर्ला, घाटकोपर आणि मुलुंडमधून ज्यादा बसेस सोडल्या. 

आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा

रेल्वे परीक्षेतील गोंधळाविरोधात या विद्यार्थ्यांनी रेल रोकोचे अस्त्र उगारले होते.स्थानिक भुमीपुत्रांना व इतर राज्यातील भुमीपुत्रांना रेल्वे सेवेत कायमस्वरुपी समाविष्ट करण्यात यावे, अशी त्यांची मागणी होती. पूर्वी रेल्वे अप्रेटिंसना थेट रेल्वेत सामावून घेतले जात होते. पण आता त्यासाठी 20 टक्के इतका कोटा ठरवला गेला. शिवाय एक लेखी परीक्षाही द्यावी लागते. त्यामुळे रेल्वेतील संधी कमी झाल्याचा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे. मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचाही इशारा यावेळी आंदोलकांनी दिला. यामध्ये अनेक मराठी तरुणांचाही समावेश आहे. 

30 लोकल रद्द; लांब पल्ल्याच्या गाड्या रखडल्या

रेल्वेभरतीतील गोंधळाविरोधात अ‍ॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाइन असणारी लोकलसेवा ठप्प झाली. दादर ते माटुंगादरम्यान करण्यात आलेल्या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. जवळपास 30 लोकल रद्द कराव्या लागल्या. सोबतच लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला. यामध्ये मांडवी एक्स्प्रेस, उद्यान एक्स्प्रेस, पुष्पक एक्स्प्रेस आणि कोयना एक्स्प्रेसचा समावेश होता. या सर्व एक्स्प्रेस जवळपास तीन तास उशिराने धावल्या. 

तीन महिन्यांपासून सुरू होते आंदोलनाचे नियोजन

साडेतीन तास चाललेल्या आंदोलनाची जराही पूर्वकल्पना पोलीस आणि रेल्वे प्रशासनाला नसल्याने त्यांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले. इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कसे गोळा झाले याविषयी आंदोलकांपैकी काही विद्यार्थ्यांनी याचे रहस्य सांगितले. गेल्या अडीच-तीन महिन्यांपूर्वीच या आंदोलनाचा पाया रचला गेला. 
हे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी केलेले पहिले आंदोलन नसून काही महिन्यांपूर्वी नवी दिल्लीतही आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी नेहमीच्या सरकारी थाटात अहवाल बनवले गेले, मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले गेले. मात्र परिस्थिती जैसे थे राहिली. त्यामुळे या प्रशिक्षणार्थींपैकी काहिंनी अत्यंत नियोजनपूर्वक आंदोलन करण्याचे आणि तेही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत करण्याचे ठरवले.

डिसेंबरमध्येच ठरवले गेले की आंदोलनाची तारीख 20 मार्च असेल आणि ठिकाण मुंबईमधले दादर माटुंगा परीसर. देशभरात जवळपास 25 हजार प्रशिक्षणार्थी आहेत. महाराष्ट्रामधून भरत परदेशी याने तर इतर राज्यांमधून अन्य आयोजकांनी जमेल त्या मार्गाने या सगळ्यांचे फोन नंबर मिळवण्यास सुरुवात केली. ज्यांचे-ज्यांचे नंबर मिळाले त्यांना या आंदोलनाची कल्पना दिली गेली. आश्चर्याची बाब म्हणजे देशभरातल्या सगळ्या राज्यांमध्ये विखुरलेल्या रेल्वेच्या प्रशिक्षणार्थींना हे मेसेज पाठवले गेले आणि महाराष्ट्रासह बिहार, पंजाब, उत्तर प्रदेश व कर्नाटक आदी अनेक राज्यांमधून काल 19 मार्चच्या रात्रीच शेकडो प्रशिक्षणार्थी मुंबईत दाखल झाले. 20 तारखेला सकाळी सातवाजल्यापासून गाटागटाने हे आंदोलनकर्ते विद्यार्थी घटनास्थळी पोहोचले. 

राज ठाकरेंचा पाठिंबा

प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनाला मनसेनं पाठिंबा दिला आहे. रेल्वे आंदोलन मागे घेतल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एमआयजी क्लब इथे आंदोलकांची भेट घेतली. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या रास्त असल्याचे राज म्हणाले. आंदोलनकर्त्यांना घेऊन पक्षाचे नेते दिल्लीला जातील, मनसे नेते दिल्लीत जाऊन रेल्वे मंत्र्यांची भेट घेतील आणि समस्या सोडवण्यासाठी होतील तेवढे प्रयत्न करतील असे आश्वासनही राज यांनी आंदोलनकर्त्यांना दिले.

मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि मनसेचे कार्यकर्ते आंदोलनस्थळी पोहोचले होते. त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. आम्ही तोडगा काढण्यासाठी इथे आलो आहोत. मात्र विद्यार्थी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. रेल्वेच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी येऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करावी, असेही त्यांनी सांगितले. रेल्वेच्या अधिकार्‍यांनी प्रसारमाध्यमांवरुन चर्चा करण्याऐवजी इथे येऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करावी, असेही देशपांडे म्हणाले. मात्र रेल्वे अधिकार्‍यांनी घटनास्थळी येणे टाळले.

आजच्या या आंदोलनामुळे शाळा, कॉलेजमध्ये सुरू असलेल्या परीक्षांना विद्यार्थी पोहचू शकले नाहीत. त्यामुळे परीक्षार्थींना एक तास वेळ वाढवून देण्यात आला आहे, असे परिपत्रकच मुंबई विद्यापीठाकडून जारी करण्यात आले. दहावीच्या विद्यार्थ्यांबरोबरच बीए, बीकॉम आणि बीएससीचे पेपर होते. आंदोलनामुळे विद्यार्थी वेळेवर पोहोचू न शकल्याने त्यांना वेळ वाढवून दिल्याने मोठा दिलासा मिळाला.      

सेना खासदारांच्या शिष्टमंडळाने घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट

रेल्वे अ‍ॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी मंगळवारी शिवसेनेच्या खासदारांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन निवेदन दिले. खासदार आनंदराव अडसूळ, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, चंद्रकांत खैरे, श्रीकांत शिंदे, भावना गवळी, गजानन कीर्तिकर यांच्यासह अन्य सेना खासदारांच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली. 

रस्त्यांवर वाहनांच्या रांगा

विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा मोठा परिणाम मुंबईच्या रस्ते वाहतुकीवर झाला. रेल्वे वाहतुकीचा खोळंबा झाल्याने अनेकांनी आपल्या खाजगी गाड्यांचा वापर केल्याने सर्वत्र वाहतुकीची कोंडी पाहायला मिळाली. ईस्टर्न फ्री वेवर मंगळवारी सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शिवाय सायन-वांद्रे रस्त्यांवरही वाहनांची गर्दी पाहायला मिळाली. अनेकांना आपले कार्यालय गाठता आले नाही.

बेस्टच्या 155 बसेस प्रवाशांच्या सेवेत

रेल्वे वाहतुक सुमारे साडेतीन तास ठप्प झाल्यानंतर पुन्हा एकदा बेस्ट बसेस प्रवाशांच्या मदतीसाठी धावून आल्या आहेत. मंगळवारी सकाळी रेल्वे मार्गावरचे आंदोलन, ओला - उबेरचे आंदोलन या पार्श्वभूमीवर प्रवाशांसाठी बेस्ट प्रशासनाकडून ज्यादा बसेसची सोय करण्यात आली. बसेस कुर्ला, घाटकोपर, माटुंगा भागातून सुमारे 155 बसेस प्रवाशांकरिता सोडण्यात आल्या. मुंबईकर प्रवाशांची गैरसोय होता कामा नये यासाठी पश्चिम मार्गांवरील डेपोंमधूनही अधिक बसेस मागवण्यात आल्या, अशी माहिती बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी दिली. 

रेल्वे आंदोलनामुळे डबेवाल्यांच्या सेवेवर परिणाम

रेल रोकामुळे मुंबईतील डबेवाल्यांच्या सेवेवर परिणाम झाला. विद्यार्थ्यांच्या रेल रोकोमुळे सकाळी कामावर पोहोचण्यासाठी घराबाहेर पडलेले प्रवासी ठिकठिकाणी अडकून पडलेले होते. मुंबईकरांना डबे पोहोचवणारे डबेवालेही रेल्वेत अडकले होते. मध्य रेल्वेवर कल्याणपासून ते माटुंग्यापर्यंत प्रत्येक स्थानकावर डबेवाले अडकून पडले. डबेवाले डब्यांसहित अडकून पडल्यामुळे डबे पोहोचवण्यात अडचणी आल्या. अनेकांना आपला घरचा डबा मिळालाच नाही.

वनरुपी क्‍लिनिकने केले जखमींवर उपचार

वनरुपी क्‍लिनिकने आंदोलनात जखमी झालेल्या अकराहून अधिक पोलिसांवर उपचार केले. आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी दगडफेक केली. त्या दगडफेकीत अकराहून अधिक पोलीस जखमी झाले. तसेच पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर देखील वनरुपी क्‍लिनिकमध्ये उपचार करण्यात आले.