Wed, Mar 20, 2019 08:31होमपेज › Mumbai-Thane-Raigad › केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशात मोकळे रान

केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशात मोकळे रान

Published On: Jun 04 2018 1:31AM | Last Updated: Jun 04 2018 1:24AMमुंबई : पवन होन्याळकर

यंदाच्या अकरावी प्रवेशात शालेय शिक्षण विभागाने गेल्या दहा वर्षांपासूनचे अकरावी प्रवेशाचे नियम धाब्यावर बसवत ‘आयबी’, ‘आयजीसीएसई’ या केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशात मोकळे रान देण्याचा अजब निर्णय घेतला आहे. या बोर्डांचे उशिरा निकालांचे कारण सांगून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रावर दिलेल्या अपेक्षित श्रेणी (प्रेडिक्टेड ग्रेड) वरून अकरावीला प्रवेश दिले जाणार असल्याने वादंग होण्याची चिन्हे आहेत.

आयजीसीएसई आणि आयबी बोर्डांचे दरवर्षी निकाल ऑगस्टमध्ये लागतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे निकाल लागल्यानंतरच त्यांना अकरावी ऑनलाईनमध्ये प्रवेशाची संधी गेल्या दहा वर्षांपासून दिली जात आहे. यंदा मात्र शालेय शिक्षण विभागाने गेल्या कित्येक वर्षांपासून चालत  असलेल्या नियमात बदल करत या बोर्डाच्या विद्यार्थ्यांना विशेष महत्व दिले जात आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिवांनी 2 जून रोजी एक परिपत्रक राज्यातील शिक्षण उपसंचालकांना जारी केले आहे. या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका वेळत  मिळत नाही या कारणामुळे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून नियम मोडून तात्पुरत प्रवेश दिले जाणार आहेत. आयजीसीएसई विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रामध्ये अपेक्षित श्रेणी (प्रेडिक्टेड ग्रेड) नमूद केलेले आहेत. या ग्रेडचे गुणात रुपांतर करुन या विद्यार्थ्यांना अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशात संधी दिली जाणार आहे. दरवर्षी गुणपत्रिका मिळाल्यानंतर दरवर्षी सुमारे एक ते दीड हजार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यंदा मात्र या विद्यार्थ्यांना प्रोव्हीजनल (तात्पुरत्या) स्वरुपाचा प्रवेश देवून इतर विद्यार्थ्यांवर अन्याय करण्याचे षडयंत्र मंत्रालय स्तरावर सुरु असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. 
या बोर्डात मंत्रालयातील बड्या अधिकार्‍यांचीच मुले शिकत असल्यामुळे या विद्यार्थ्यांना वेगळा न्याय देण्याचा घाटही चालू केला असल्याची चर्चाही आहे.