Wed, May 27, 2020 01:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत कोरोना मृतकांसाठी कब्रस्तानांमध्ये अखेर वेगळी व्यवस्था!

मुंबईत कोरोना मृतकांसाठी कब्रस्तानांमध्ये अखेर वेगळी व्यवस्था!

Last Updated: Apr 08 2020 9:37AM

संग्रहित छायाचित्रमुंबई  : पुढारी वृत्तसेवा

कोरोना'मुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांच्या दफन व्यवस्थेसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. 'रझा अकादमी' या संघटनेच्यावतीने साबिर निर्बन यांच्या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली. यात कोरोना मृतकांसाठी कब्रस्तानांमध्ये अखेर वेगळी व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीमध्ये दफन व्यवस्थेसंदर्भात विविध मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली. मरिन लाईन्स येथील बडा कब्रस्थान हे सर्व कब्रस्थानांचा केंद्रबिंदू असेल असे या बैठकीत ठरले. अस्लम शेख यांनी दफन व्यवस्थेसंदर्भात सर्व प्रकारचे सहकार्य शासनाच्या माध्यमातून करण्याची ग्वाही दिली. बडा कब्रस्तानचे शोएब खतीब यांनी सांगितले की, मुंबई शहरामध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांसाठी बडा कब्रस्तानमध्ये वेगळ्या कबरी (थडगी) राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. अन्य कब्रस्तानांमध्ये देखील अशीच व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. मुंबई बाहेरील मृतशव एलबीएस कब्रस्तान येथे दफन केले जातील. माहिम कब्रस्तानात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांसाठी पुढील २ दिवसांत अशा प्रकारची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती खतीब यांनी दिली.

'कोरोना' मृतांचा दफनविधी जलद व्हावा यासाठी सुहैल खंडवानी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कार्यदल स्थापन करण्याचाही निर्णय बैठकीत झाला.  अल्लाहज सईद नूरी यांनी शब ए बारात च्या दिवसांमध्ये घरीच राहण्याचे, सर्व सर्व धार्मिक विधी घरीच करण्याचे व मस्जिद, कब्रस्तानांमध्ये जाण्यास मनाई असल्याने तेथे न जाण्याचे आवाहन केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

बैठकीला हाजी अली व माहिम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवाणी, बाबा कब्रस्थानचे व्यवस्थापक शोएब खतीब, वक्फ बोर्ड ऑफ महाराष्ट्राचे डॉ. लांबे, जामा मस्जिदचे विश्वस्त हसीब किरकिरे, माहिम कब्रस्तानचे विश्वस्त इम्रान मुजफ्फर खान, साबिर निर्बन, अलहाज सहिद नुरी आदी मान्यवर उपस्थित होते.