Tue, Nov 19, 2019 13:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › षण्मुखानंदात रंगली  ‘एका युतीची पुढची गोष्ट’

षण्मुखानंदात रंगली  ‘एका युतीची पुढची गोष्ट’

Published On: Jun 20 2019 2:07AM | Last Updated: Jun 20 2019 2:07AM
मुंबई : खास प्रतिनिधी

कुणी कितीही आघाड्या केल्या, कुणीही एकत्र आले, तरी आता शिवसेना आणि भाजपा ही वाघ-सिंहाची जोडी एकत्र आली असून पुढचे राज्य कुणाचे असेल, हे सांगण्याची गरज नाही, असा ठाम विश्‍वास व्यक्त करताना आता मंत्री कोण, मुख्यमंत्री कोण याची चर्चा मीडियाला करू द्या, आमचे सगळे निर्णय योग्य वेळी जाहीर करू, विधानसभेच्या निवडणुकीत न भूतो असा विजय मिळवण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसैनिकांना केले. शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याच वेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही आमचे ठरलेय, असे सांगताना सेना-भाजपा युतीचे नाटक नसून ही युतीची पुढची गोष्ट आहे, असे स्पष्ट केले. मात्र, समसमान वाटणीबाबतची आठवण करून द्यायला ते विसरले नाहीत. 

शिवसेनेचा 53 वा वर्धापनदिन आज षण्मुखानंद सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेने प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते.अन्य पक्षाचा नेता सेनेच्या वर्धापनदिनास प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे या मेळाव्यात मुख्यमंत्री काय बोलणार, त्यास उध्दव कसे उत्तर देणार याची चर्चा चांगलीच  रंगली होती. मात्र, आपल्या भाषणाच्या सुरूवातीसच उध्दव ठाकरे यांचा मोठा भाऊ असा उल्लेख करून मुख्यमंत्र्यांनी  युतीतला ताणतणाव निवळल्याची चुणूक दिली, आणि नंतर त्यांच्दया आणि ठाकरे यांच्या भाषणामुळे याची खात्रीच पटली! सारे काही आलबेल असल्याचे सांगण्याची आणि एकमेकांवर किती प्रेम आणि विश्‍वास आहे हे सांगण्याची जणू चढाओढच लागली होती.

मुख्यमंत्र्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्मृती जागवताना त्यांचाच आशिर्वाद घेण्यासाठी आपण आलो असल्याचे सांगताच शिवसैनिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. त्याचवेळी शिवसेना वाढली पाहिजे, विस्तारली पाहिजे असे सांगत व्यापक हिंदुत्वासाठी शिवसेनेची साथ आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. आगामी विधानसभा निवडणुकीत न भूतो असे यश मिळवन्यासाठी एकत्रितपणे काम करूया असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 

शिवसेना-भाजप ही वाघ-सिंहाची जोडी आहे आणि वाघ-सिंहाची जोडी एकत्र येते तेव्हा जंगलात राज्य कोण करणार, हे सांगावे लागत नाही. आता 56 पक्ष एकत्र येवोत की, 156 पक्ष एकत्र येवोत कौल वाघ-सिंहालाच मिळणार, असा विश्‍वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

युतीमधल्या तणावाचे वर्णन करताना दोन भाऊ एकत्र राहतात तेव्हा कधी कधी ताणतणाव निर्माण होतोच पण हा तणाव आता दूर झाला असून भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण झाली आहे, युती भक्कम आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

शिवसेना-भाजपची युती भारतात सर्वाधिक काळ टिकलेली युती असून यावेळीही भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनात युती व्हावी असे होते. लोकसभेच्या निवडणुकीतल्या विजयाचे खरे शिल्पकार शिवसैनिक आणि भाजपाचे कार्यकर्ते हेच आहेत, असे नमूद करताना आपण सगळे भगव्यासाठी आणि व्यापक  हिंदुत्वासाठी एक आहोत असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर युतीचे सरकार वाटचाल करीत असून आता राज्याच्या भल्यासाठी आणि जनतेच्या हितासाठीच काम करण्याची शपथ घेतली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाची जाणीव करून ेदेताना आता हा दुष्काळ भूतकसाळात घालवन्याची शपथ घेऊया असे सांगताना मंत्री कोण, मुख्यमंत्री कोण याची चर्चा मीडियाला करू द्या. माझ्या कार्यकर्त्यांचा माझ्यावर आणि शिवसैनिकांचा उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर विश्‍वास आहे त्यामुळे या चर्चा कडे दुर्लक्ष करा. आम्ही निर्णय घेतले आहेत, ते योग्य वेळी जाहीर करू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.     

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांचा उल्लेख एक चांगला नेता आणि व्यक्तीगत मित्र असा करताना भाजपाशी युती केली, तेव्हाच सगळ्या गोष्टींचा विचार केला आहे. आमचे ठरलेय, तुम्ही चिंता करू नका, असे सूचक वक्तव्य उद्धव  यांनी केले. युती करण्याची भावना महत्वाची आहे. देशात अनेक राज्यात युती आणि आघाड्या झाल्या,राजकारणासाठी विरोधकांच्या आघाड्या होतात, मात्र आपण आता  आता भाजपासोबत एकसाथ दौडायचे आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना दोघांच्याही कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले होते. हा एकोपा पुढेही टिकला पाहिजे. आपण एकमेकांत लढून सोन्याची माती करतो, आता अशी माती होऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

सगळेच समसमान होऊ द्या!

मुख्यमंत्र्यांना कार्यक्रमाला बोलावले तर काहीजणांच्या पोटात कशासाठी दुखते? असे विचारताना याआधीही ही परंपरा होती, असे उध्दव यांनी नमूद केले. भाजपच्या अधिवेशनात शिवसेनाप्रमुखांना आमंत्रित केले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली. अनेक भाजप नेत्यांनीही शिवसेनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मध्यंतरी परंपरा खंडित झाली होती. मात्र  मधल्या काळातला दुरावा आता पूर्व नाहीसा झाला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आता मलाही तुमच्या एखाद्या कार्यक्रमात बोलवा, सगळे कसे समसमान व्हायला हवे, असे उध्दव म्हणताच हशा-टाळ्यांच्या कडकडाटाने सभागृह दुमदमून गेले. मात्र, आपण हे फक्य कार्यक्रमाच्या आमंत्रणाबद्दल बोलत आहोत, वेगळा अर्थ काढू नका असे उध्दव मिश्कीलपणे म्हणाले.