Fri, Apr 19, 2019 12:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कमला मिल आगीस पालिका जबाबदार; काँग्रेसची तक्रार

कमला मिल आगीस पालिका जबाबदार; काँग्रेसची तक्रार

Published On: Jan 17 2018 2:00AM | Last Updated: Jan 17 2018 1:15AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

कमला मिलमधील हॉटेल्सला आग लागून घडलेल्या दुर्घटनेत 14 निरपराध नागरिकांचा बळी गेला आहे. मुंबई महानगर पालिकेतील भ्रष्टाचार आणि आयुक्तांचा नियमबाह्य व बेकायदेशीर कारभारच यास कारणीभूत असल्याची तक्रार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी.विद्यासागर राव यांची भेट घेऊन केली. या प्रकरणी आयुक्तांविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली. 

मुंबई शहरातील सर्व अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम आणि तिथे सुरू असलेल्या अवैध व्यवसायांची मुंबई महानगर पालिकेला संपूर्ण माहिती आहे. तरीही त्याविरुद्ध कारवाई केली जात नाही. आग लागलेल्या दोन्ही हॉटेल्समध्ये विनापरवाना हुक्का पार्लर चालविले जात होते. त्यांच्याकडे अनधिकृत व असुरक्षित बांधकाम करण्यात आलेले होते. ही बाब अग्निशमन विभागाच्या अहवालातही नमूद करण्यात आली आहे. कमला मिल आग दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, या घटनेची चौकशी सीबीअयकडे सोपविण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांनी यावेळी केली. 

कमला मिलबरोबरच रघुवंशी मिल, फिनिक्स मिल, टोडी मिलसह शहरातील सर्वच मिलमधील इमारती व तेथील व्यवसायांच्या परवान्यांचीदेखील सखोल चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले.