Sun, Mar 24, 2019 22:59
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › हजारोंची पदे आता रद्द

हजारोंची पदे आता रद्द

Published On: Sep 09 2018 2:13AM | Last Updated: Sep 09 2018 2:01AMमुंबई : खास प्रतिनिधी

जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न करणार्‍या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करावे, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकारी व मनपा आयुक्‍तांना दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जात वैधता प्रमाणपत्रासंबंधात दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करावी, असे आदेशात म्हटले आहे. या आदेशानुसार ग्रामपंचायतीपासून महापालिकेपर्यंत नऊ हजारांवर सदस्यांचे पद रद्द करण्याची कारवाई सुरू झाली आहे. 

राज्य निवडणूक आयुक्‍त ज. स. सहारिया यांच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाचे अवर सचिव नि. ज. वागळे यांनी याबाबतचे पत्र सर्व जिल्हाधिकारी व आयुक्‍तांना पाठवले आहे. तसेच या आदेशाची प्रत सर्व विभागीय आयुक्‍तांनाही देण्यात आली आहे. दरम्यान, ही कारवाई थांबवण्यासाठी सत्तारूढ तसेच विरोधी पक्षांकडूनही सरकारवर दबाव येत असून, मुदतवाढ देण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत.

म्युनिसिपल कौन्सिल अ‍ॅक्टच्या नवव्या कलमानुसार राखीव जागेवर निवडून येणार्‍या उमेदवारांनी निकालानंतर सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास अशा उमेदवाराचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 23 ऑगस्टला दिला होता.

राज्य सरकारने 2000 मध्ये केलेल्या कायद्यानुसार निवडणूक अर्जासोबतच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. मात्र, जात पडताळणी समित्यांची मर्यादित संख्या आणि पडताळणीस लागणारा विलंब लक्षात घेऊन तीन वर्षांपूर्वी कायद्यात सुधारणा करून निवडून आल्यानंतर सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत दिली गेली. मात्र, प्रमाणपत्रासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत आणि निवडून आल्यापासून सहा महिन्यांत वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र उमेदवारी अर्जासोबतच देण्याची तरतूद करण्यात आली होती. असे प्रतिज्ञापत्र देऊनही सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यावरून कोल्हापूर महापालिकेतील 20 नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. याखेरीज महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील काही हजार सदस्य अपात्र ठरण्याची शक्यता आहे.