Thu, Jul 18, 2019 08:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘जाती आहेत तोपर्यंत आरक्षण राहणार’

‘जाती आहेत तोपर्यंत आरक्षण राहणार’

Published On: Feb 23 2018 9:24AM | Last Updated: Feb 23 2018 9:24AMमुंबई : प्रतिनिधी

जोपर्यंत देशात जात व्यवस्था व जाती अस्तित्वात आहेत तोपर्यंत जातीवर आधारित आरक्षण लागू राहील. मात्र सर्व आरक्षण आर्थिक निकषावर करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला पूर्ण ताकदीने विरोध केला जाईल व हा प्रयत्न उधळून लावण्यात येईल, असा स्पष्ट इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. 

सध्या सुरू असलेल्या दलित आदिवासी ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू दिला जाणार नाही याची काळजी घेण्याची ग्वाही आठवले यांनी दिली. जातींवर आधारित आरक्षणाविरोधात बोलण्यापूर्वी जातीव्यवस्था नष्ट करण्याची गरज आहे. 

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घेतलेल्या मुलाखतीमध्ये पवार यांनी जातीच्या निकषावर नव्हे तर आर्थिक निकषावर आरक्षण असावे अशी भूमिका मांडली होती त्या भूमिकेला आठवले यांनी तीव्र विरोध केला आहे.  पवार यांनी अनेकदा दलित व आदिवासींची बाजू घेतली आहे, ते पुरोगामी व धर्मनिरपेक्ष विचारांचे नेते आहेत. 

मात्र जातीच्या निकषाऐवजी आर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या त्यांच्या भूमिकेला आपला विरोध आहे. असा प्रयत्न झाल्यास आपण तो हाणून पाडू, असे आठवले यांनी स्पष्ट केले. डॉ  बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आरक्षण हे दलित आदिवासींची कवचकुंडले आहेत. दलित आदिवासी ओबीसींच्या जाती आधारित आरक्षणाला कधीही धक्का लागू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.  

आर्थिक निकषावर आरक्षण देताना दलित, आदिवासी व ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.त्यासाठी आरक्षणाची मर्यादा 75 टक्के करण्यात यावी ,व संसदेत कायदा करावा अशी मागणीआठवले यांनी केली. असे झाल्यास आरक्षणाच्या नावावर जाती जातींमध्ये होणारी भांडणे मिटतील, असे ते म्हणाले.