Fri, Jul 19, 2019 19:48होमपेज › Mumbai-Thane-Raigad › सोडून दिलेल्या कार्सचा मुंबईतील २० एकर जागेवर ताबा

सोडून दिलेल्या कार्सचा मुंबईतील २० एकर जागेवर ताबा

Published On: Dec 04 2017 1:58AM | Last Updated: Dec 04 2017 1:17AM

बुकमार्क करा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

एका बाजूला सर्वसामान्य मुंबईकराला आपली कार पार्क करण्यासाठी मजबूत रक्कम मोजावी लागत असताना दुसर्‍या बाजूला मुंबईतील रस्त्यांवर सोडून देण्यात आलेल्या हजारो कारनी तब्बल 20 एकरापेक्षा जास्त जागा व्यापली असल्याचे मुंबई महापालिकेने केलेल्या पाहणीत समोर आले आहे. 1 जानेवारी 2016 पासून 23 ऑगस्ट 2017 दरम्यान तब्बल 6,413 कार रस्त्यांवर बेवारस स्थितीत उभ्या असलेल्या आढळून आल्या आहेत. यातील 2826 वाहनांचा लिलाव करण्यात आला. 

मुंबई महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागातर्फे गेल्या ऑक्टोबरमध्ये करण्यात आलेल्या आणखी एका सर्वेक्षणात 605 आणखी बेवारस गाड्या आढळून आल्या असून त्यांना आता हटवण्यात येणार आहे. 23 ऑगस्टला झालेल्या पहिल्या लिलावात महापालिकेने 2826 गाड्यांसाठी निविदा मागवल्या होत्या. यातून महापालिकेला 1.14 कोटींचा महसूल मिळाला आहे.  

यासंदर्भात सामान्य नागरिकांकडून वारंवार आलेल्या तक्रारींवरून महापालिकेने हे पाऊल उचलले आहे. अशा वाहनांपासून सामान्य जनतेला धोका निर्माण होऊ शकतो, असा या तक्रारींचा सूर आहे. बेवारस वाहने दूर करण्याच्या प्रक्रियेसंदर्भात बोलताना सहाय्यक नगरपालिका आयुक्त मधुकर मगर यांनी सांगितले की, बेवारस स्थितीत आढळून आलेल्या वाहनांवर नोटीस लावून महापालिकेतर्फे 48 तासांमध्ये ती हटवली जातात. यानंतर वाहनांवर दावा करणार्‍या मालकांना 30 दिवसांची मुदत दिली जाते. यादरम्यान सदर वाहने महापालिकेच्या वरळी, अंधेरी व घाटकोपर येथील गोदामांमध्ये ठेवली जातात.

गाडी सोडून देणार्‍या मालकांना 10 ते 15 हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जातो. मुंबईत उच्चवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये किमान दोन ते तीन चारचाकी गाड्या असतात. नवी गाडी घेताना जुनी गाडी एकतर विकली जाते किंवा ती विकली न गेल्यास रस्त्याच्या एका बाजूला उभी करून ठेवली जाते. जोगेश्‍वरी, अंधेरी आणि विलेपार्ले येथे सर्वाधिक संख्येने सोडून दिलेल्या गाड्या उभ्या आहेत. महापालिकेने एका महिन्यात 200 हून अधिक गाड्यांवर नोटिसा चिकटवल्या आहेत. 

यासंदर्भात वाहतूक तज्ज्ञांनी सांगितले की, चालू स्थितीत असणार्‍या गाडीसाठी पार्किंग शुल्क आकारले जाते. तर नादुरुस्त पडलेली गाडी रस्त्याची बहुमूल्य जागा अडवते. मुंबई महापालिकेने या संदर्भात ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. कारण अशा गाड्या केवळ रस्ताच अडवत नाहीत. तर त्यावर धूळ जमा होवून प्रदूषणाचा त्रास देखील होतो. अशा गाड्यांचा तात्काळ लिलाव करून त्या मोडीत काढण्याची प्रक्रिया अवलंबणे गरजेचे आहे. महत्त्वाचा भाग म्हणजे कुणीही आपली गाडी रस्त्यावर तशीच सोडून देता कामा नये, यासाठी कठोर नियम पालिकेने तयार करावेत. त्यासाठी जबर दंड आकारावा.