Thu, Jul 18, 2019 10:10होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कारच्या धडकेत गंभीर जखमी डॉक्टर तरुणीचा मृत्यू

कारच्या धडकेत गंभीर जखमी डॉक्टर तरुणीचा मृत्यू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

मरीन ड्राईव्ह परिसरातून भरधाव वेगाने जात असलेल्या कारच्या धडकेत गंभीर जखमी होऊन मृत्यूशी झुंज देणार्‍या डॉ. दीपाली लहामटे हिचा गुरूवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टर बनलेल्या भावाचे अभिनंदन करण्यासाठी जात असताना 24 मार्च रोजी लहामटे हिला कारने धडक दिली होती. तिच्यावर भाटीया रुग्णालायत उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस तपास करत आहेत.

नायर रुग्णालयाच्या दंत महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून काम करत असलेली दीपाली 24 मार्चला तिच्या भावाच्या जे. जे. जिमखान्यातील कॉन्व्होकेशनला जात होती.तारापोरवाला मत्स्यालयाजवळ असलेल्या सिग्नलवरुन रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या होंडा सिटी कारने तिला जोराची धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दीपालीला मदत न करताच कारचालकाने तेथून पळ काढला. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना देत जखमी अवस्थेतील दीपालीला तात्काळ उपचारांसाठी भाटीया रुग्णालयात दाखल केले. तेथे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. 

दरम्यान, तरुणीला धडक देऊन कारचालक महिला पसार होत असल्याचे लक्षात येताच एका व्यक्तीने तिचा पाठलाग करुन पुढच्या सिग्नलवर तिला गाठत याची माहिती पोलिसांना दिली. अखेर याप्रकरणी गुन्हा दाखल करुन आरोपी कारचालक शिखा झवेरी हिला पोलिसांनी अटक केली. शिखा ही शिक्षिका आहे. ती धाकट्या मुलीसोबत कारने जात असताना हा अपघात घडला होता. घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बंद आहेत. तसेच दीपाली सुद्धा त्यावेळी जिवंत असल्याने दाखल गुन्ह्यात शिखाला जामीन मिळाला. त्यामुळे नायर हॉस्पिटल डेंटल कॉलेज स्टुडंट असोसिएशनने आरोपी चालकाला शिक्षा होऊन दीपालीच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी फेसबूकच्या माध्यमातून प्रत्यक्षदर्शींना पोलिसांकडे जबाब नोंदविण्यासाठी आवाहन सुरू केले आहे.

गंभीर जखमी अवस्थेतील दीपाली गेले चार दिवस लाईफ सपोर्ट सिस्टमवर मृत्यूशी झुंज देत होती. अखेर शुक्रवारी तिची प्राणज्योत मालवली. दीपालीच्या मृत्यूने लहामटे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मात्र दीपालीच्या भावाने तिचे अवयव दान करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दाखल गुन्ह्यातील यापूर्वीची कलमे ही जामीनपात्र असल्याने आरोपी चालकाला जामीन मिळाला होता. मात्र दीपालीच्या मृत्यूनंतर गुन्ह्यामध्ये सदोष मनुष्यवधाचे कलम वाढविण्यात आले आहे. ही सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर करुन न्यायालयाच्या आदेशाने पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त मनोजकुमार शर्मा यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

दुभाजकावर धडकून दोन दुचाकीस्वार ठार

भायखळ्यातील लालबाग उड्डाणपुलावरुन भरधाव वेगाने जात असलेल्या राजू खान (25) आणि विजय चौधेकर (20) या तरुणांच्या मोटारसायकलची दुभाजकाला धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. दादरहून भायखळ्याच्या दिशेने जात असताना राणीबागेजवळ रात्री अडीचच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. याप्रकरणी दुचाकीचालक खान विरोधात गुन्हा दाखल करुन भायखळा पोलीस तपास करत आहेत. 

 

Tags : mumbai, mumbai news, Car accident, injured doctor, died,


  •